धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
--
शेतात गेल्याची संधी;
३.२७ लाख लंपास
धुळे : चिकसे-पिंपळनेर रस्त्यालगत जिरापूर (ता. साक्री) येथील दिनेश बंडू महाले यांच्या मळ्यातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख २७ हजारांचा ऐवज नेला. दहा ऑक्टोबरला दुपारी महाले आणि त्यांची पत्नी शेतात कामासाठी गेले असताना ही घटना घडली. चोरट्यांनी दोन कपाटे फोडून ९० हजार रुपये रोख, १५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, तीन ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि सहा भार चांदी, असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
साक्ष नाकारल्याने
बालकाला मारहाण
धुळे : साक्ष देण्यास नकार दिल्याच्या रागातून शहरातील मोहाडी येथे सनी ऊर्फ संजय थोरात याने एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना नऊ ऑक्टोबरला दुपारी बाराच्या सुमारास जय हरी सायकल मार्टजवळ घडली. साक्ष देण्यास नकार दिल्याने थोरात याने बालकाला गाठून त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्याला खाली पाडून हाताबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ केली. पीडित बालकाच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
पसार बंदीवान
पोलिसांच्या हाती
धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १३ च्या स्वच्छतागृहाची खिडकी काढून पसार झालेल्या बंदीवानाला शहर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. फैजल मुज्जमिल अन्सारी (वय २३, रा. गफूरनगर, चाळीसगाव रोड, धुळे) असे त्याचे नाव आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. दहा ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास त्याने स्वच्छतागृहाच्या खिडकीची काच काढून पलायन केले. या प्रकरणी पोलिस शिपाई विनोद गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.
-
बेपत्ता वृद्धाचा
विहिरीत मृतदेह
धुळे : शहरातील पारोळा रोड परिसरात बेपत्ता झालेल्या सुकदेव गुलाब मोरे (वय ७०, रा. शाहू महाराज नाट्य मंदिर परिसर) यांचा मृतदेह घरामागील विहिरीत आढळला. दहा ऑक्टोबरला सकाळी ते घरी नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. शोध घेतला असता विहिरीजवळ त्यांची चप्पल आणि चष्मा आढळला. विहिरीतील पाण्यावर त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-