धुळे : टुडे पान १ साठी..
--
धुळ्यात मंगळवारी रोजगार मेळावा
--
विविध क्षेत्रांतील ३० रिक्त पदांसाठी मुलाखतींची संधी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. ‘प्लेसमेंट ड्राइव्ह-११’ अंतर्गत मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेदहा ते दोन या वेळेत जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय संकुलात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील कंपन्यांकडून ३० रिक्त पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि अग्नि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन झाले आहे. यात चंदुकाका सराफ (दागिन्यांचे शोरूम), एकदंता स्पिनिंग प्रा. लि., सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि कॉस्मेटिक मॉल या चार प्रमुख आस्थापना सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात विक्री कार्यकारी, विपणन कार्यकारी, रोखपाल (कॅशिअर), उत्पादन पर्यवेक्षक, गोदाम व पॅकिंग पर्यवेक्षक, यांत्रिक अभियंता, मदतनीस, स्टोअर कीपर, गुणवत्ता नियंत्रक, गुणवत्ता आश्वासन, फिटर, इलेक्ट्रिशियन, देखभाल मदतनीस, विद्युत अभियंता, रिलेशनशिप ऑफिसर, लेखापाल आणि बिलिंग कार्यकारी या पदांसाठी भरती होणार आहे.
यात दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविकाधारक, पदवीधर व अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार पात्रतेनुसार धुळे व शिरपूर येथे नोकरीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ''Placement Drive-11 (2026-27) DHULE'' अंतर्गत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटाच्या किमान दोन प्रती व छायाचित्रे सोबत घेऊन मंगळवारी सकाळी दहाला निर्धारित स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.