पान दो न सेकंड मेन
-----------
09792
कळवण : चारा छावणी सुरू करण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन देताना पशुपालक.
कळवण तालुक्यात चारा टंचाई तीव्र, पशुपालक हवालदिल
चारा छावण्यांची सुरू करण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कळवण ता.२३ : तालुक्यात यावर्षी खूप कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे स्रोत आटले असून शेतातील पिके पूर्णपणे सुकली आहेत. याचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसत असून तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात चारा उपलब्ध नसल्यामुळे पशुपालक हवालदिल झाले असून, प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी कळवण तालुका दूध उत्पादक संघ आणि शेतकरी-पशुपालकांनी केली आहे. याबाबत कळवण तालुका दूध उत्पादक संघ आणि पशुपालक शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
कळवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. मात्र, मुबलक पावसाअभावी चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असून, ते खरेदी करणे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जर तातडीने चाऱ्याची सोय झाली नाही,तर पशुधनाचे हाल होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात ऊस क्षेत्र नाही आणि खरीपमध्ये चारा पिकांमध्ये फक्त मका घेतला जातो. अशा परिस्थितीत बाहेर जिल्ह्यातील चारा पुरवठादार मोठ्या प्रमाणात तालुक्यात दाखल झाले आहेत. प्रशासनाने तालुक्यातील चारा बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी आणि पुरवठादारांवर योग्य पद्धतीने नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जर यावर बंदी घातली नाही, तर पशुधनावर वाईट परिस्थिती निर्माण होईल. शेतकरी आणि पशुपालकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर ते शहरात मोकाट जनावरे सोडतील. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर गणेश पगार, प्रसाद जाधव, शुभम पगार, उमेश जाधव, गणेश बापु पगार, ऋतुराज नंदकिशोर पगार, जयेश सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पशुपालक यांच्या प्रमुख मागण्या:
- कळवण तालुक्यात तातडीने चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात,
- पशुपालकांना सवलतीच्या दरात चारा व पशुखाद्य पुरवण्यात यावे,
- तालुक्यातील चारा तालुक्यातच ठेवण्यात यावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.