जिल्ह्यात ११० दिवस पुरेल इतका चारा
---
शेतकऱ्यांना मोफत चारा, बियाणे; पशुसंवर्धन विभागाकडून तीन कोटींच्या बियाण्यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यावर आता चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या १८ लाख जनावरांना पुढील ११० दिवस (जानेवारी २०२७ अखेर) पुरेल इतका ओला व सुका चारा शिल्लक आहे. त्यानंतर चारा उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तीन कोटींच्या बियाण्यांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली.
जनावरांना दिवसाला चार हजार टन ओला किंवा सुका चारा लागतो. खरीप हंगामात झालेल्या पेरणीच्या आधारे चाऱ्याची उपलब्धता निश्चित करून त्यानुसार दुष्काळाचे नियोजन केले जाते. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याचे नियोजन केले असून, जिल्ह्यातील जनावरांना ३१ जानेवारीपर्यंत पुरेल इतका चारा सध्या शिल्लक आहे. त्यानंतर चाऱ्याची टंचाई भासू शकते म्हणून आताच चाऱ्याचे मोफत बियाणे वाटप केले जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांना हे बियाणे दिले जातील. त्यासाठी तीन कोटींची मागणी नोंदविण्यात आली. ओला आणि सुका चाऱ्याच्या आधारे उपलब्धता ग्राह्य धरली जाते. मुरघास किंवा भुसा हा सुकलेल्या चाऱ्यापासून तयार होत असल्याने त्याची गणना ही सुक्या चाऱ्यात होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करताना कमी कालावधीत येणाऱ्या चाऱ्याचा विचार करण्यात येणार आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या भागातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जाईल. चारा विकण्याची त्यांना सवलत असेल किंवा शासन हमीभावावर हा चारा खरेदी करू शकते. मात्र, याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल.
….
पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना
- जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी
- वन विभागावरील गवती कुरणाच्या ग्राम वन व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने साठा व संरक्षण
- रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त क्षेत्रावर चारा लागवड
- गाळपेरा जमिनीवरील क्षेत्रावर चारा लागवड
- कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था व बचत गटाकडे चारा बँक तयार करणे
- मुरघास, अझोला व हायड्रोफोनिक उत्पादनास चालना
- निकृष्ट वैरण प्रक्रिया प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबिरे
--कोट
चारा उपलब्ध करण्यासाठी बियाणे वाटपाची मागणी केली आहे. त्यानुसार चारा बियाणे शेतकऱ्यांना दिले जाईल. साधारणतः फेब्रुवारीपासून चाराटंचाई भासेल. त्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त (पशुसंवर्धन विभाग)
….
तालुकानिहाय पशू व उपलब्ध चारा (टन)
बागलाण.....२,०८,२०५.......१,०१,५७५
चांदवड........९८,९९४.........४३,४५६
देवळा..........८१,४३७........२९,२९२
दिंडोरी..........९५,४६९........५८,८१७
इगतपुरी........६६,७६९........३५,५६५
कळवण.........१,१२,९३२......५३,९७७
मालेगाव.........२,६८,७४०......१,२९,६०४
नांदगाव..........१,८५,४२४.......५३,०३०
नाशिक............७८,४८२........६१,५६८
निफाड...........१,३१,८५३........६९,९९२
पेठ...............४६,२९९..........३७,४७७
सिन्नर...........१,५८,४५४..........६४,६५३
सुरगाणा.........५९,७६५...........४०५७५
त्र्यंबकेश्वर........६५,३०५..........४४,४९२
येवला.............१,४४,०३९........६८,९२७
एकूण.............१८,०१,८९७.......८,९३,०००