सेकंड मेन
NSK26H32321
मुंबई : बैठकीत बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन. शेजारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे आदी.
‘गिरणा’वर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा; प्रशासकीय कार्यवाहीचे जलसंपदामंत्र्यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : गिरणा नदीवर मोठा साठवण बंधारा उभारून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. बांभोरी – निमखेडीदरम्यान यापूर्वी मंजूर झालेल्या पूल-कम-बंधारा प्रकल्पात तांत्रिक कारणांमुळे बंधारा होऊ शकला नव्हता. मात्र, पूल झाला तरी बंधारा झालाच पाहिजे, या भूमिकेवर ठाम राहत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत हा प्रश्न आग्रहाने मांडला. त्यांच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
जळगाव शहराजवळील बांभोरी–निमखेडीदरम्यान गिरणा नदीवरील पुलाला समांतर पूल-कम-बंधारा उभारण्याची संकल्पना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे आणली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे २०२२ मध्ये या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, तांत्रिक सर्वेक्षणात बंधाऱ्याच्या उभारणीबाबत अडचणी समोर आल्याने पुलाचे काम मार्गी लागले; परंतु बंधाऱ्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकली नाही. त्यानंतरही पालकमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींशी सातत्याने चर्चा करून स्वतंत्र मोठा बंधारा उभारण्याचा पर्याय पुढे आणला. नुकत्याच झालेल्या मंत्रालयातील बैठकीत त्यांनी या प्रकल्पासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आग्रही मागणी करत तांत्रिक अडचणी दूर करून काम मार्गी लावण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
या बैठकीत तापी खोरे जल नियोजन, तापी महाकाय पुनर्भरण योजना तसेच रावेर व यावल तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध प्रलंबित सिंचन प्रकल्पांचा आढावा घेऊन ते जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या देण्यात आल्या.
मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, पणन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे,आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार मंगेश चव्हाण, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चौकट
शेतीला आधार; वाळूउपशालाही बसणार आळा
प्रस्तावित बंधाऱ्यामुळे गिरणा नदीत मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होऊन परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होईल. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासही हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे, नदीपात्रात पाणीसाठा टिकून राहिल्यास अवैध वाळूउपशालाही आळा बसण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.