नाशिक

श्री हरीश मथुराप्रसाद गुप्ता

CD
कष्टाच्या बळावर शून्यातून घडलेला यशस्वी प्रवास --- हरीश मथुराप्रसाद गुप्ता ः अपार कष्ट, अढळ जिद्दीचे प्रतीक लीड जीवनाच्या पटावर प्रत्येकालाच अनुकूल परिस्थिती मिळते, असे नाही. काही व्यक्ती अशा असतात, ज्यांच्या वाट्याला जन्मतःच दारिद्र्य, संघर्ष आणि अनंत अडचणी येतात. परंतु, प्रतिकूल परिस्थितीला दोष देत हातावर हात ठेवण्यापेक्षा, संकटांच्या छातीवर पाय रोवून स्वतःचे नशीब स्वतः घडविणारेच समाजात वेगळा ठसा उमटवितात. नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडी रोडवर वास्तव्यास असलेले आणि ‘रेणुका असोसिएट ॲन्ड डेव्हलपर्स’चे संचालक असलेले हरीश मथुराप्रसाद गुप्ता हे अशाच एका अपार कष्ट आणि अढळ जिद्दीचे जिवंत प्रतीक आहेत. रस्त्याच्या कडेला बसून हातगाडीवर काकडी विकणारा एक सामान्य मुलगा ते आज एक यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक, असा त्यांचा हा खडतर; पण देदीप्यमान प्रवास अत्यंत थक्क करणारा आणि समाजासाठी दिशादर्शक आहे. -- हरीश गुप्ता यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या आणि तीव्र आर्थिक विवंचनेत गेले. त्यांच्या घरात दररोजचा दिवस संघर्षाचा असायचा. कुटुंब चालविण्यासाठी आणि दोन वेळच्या अन्नाची भ्रांत मिटविण्यासाठी त्यांचे वडील हॉकर्सचा व्यवसाय करीत असत. रस्त्यावर फिरून मिळेल ते विकणे आणि त्यातून जेमतेम काही पैसे मिळविणे हाच त्यांच्या उपजीविकेचा आधार होता. आई-वडील दोघेही पूर्णपणे अशिक्षित होते; परंतु आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्याचे भोग आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, ही त्यांची प्रामाणिक तळमळ होती. अशिक्षित आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी मोठा विचार केला. परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांनी हरीश यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता, कारण इंग्रजी शाळेचा खर्च पेलणे त्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे बालवयात खेळण्या-बागडण्याचे दिवस असतानाच हरीश यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे आले. -- बालवयातील संघर्ष हरीश गुप्ता यांनी आपले शालेय शिक्षण नाशिकच्या नामांकित ‘स्वामी विवेकानंद विद्यालय’ येथून इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पंचवटीतील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातून पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेतले. परंतु, हे शिक्षण घेत असताना त्यांना रोज एका नव्या परीक्षेला सामोरे जावे लागत होते. इयत्ता पाचवीत असल्यापासूनच त्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी स्वतः अर्थार्जन करण्यास सुरुवात केली. शाळेच्या वेळा सांभाळून ते रोज पहाटे किंवा सायंकाळी वडिलांबरोबर हातगाडीवर कामाला जात असत. नाशिकच्या रस्त्यांच्या कडेला बसून त्यांनी काकडी आणि इतर हंगामी भाजीपाला विकला. त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून त्यांनी स्वतःच्या पुस्तकांचा, वह्यांचा आणि शाळेच्या शुल्काचा खर्च भागविला. घरची परिस्थिती इतकी वाईट होती, की दोन वेळच्या जेवणाची खात्री नसायची. त्या दिवसांची आठवण काढताना हरीश गुप्ता आजही भावुक होतात. ते सांगतात, की त्या संघर्षाचे दिवस इतके दाहक होते, की देवाकडे एकच प्रार्थना असते, अशी परिस्थिती माझ्या दुष्मनालाही कधी पाहायला लागू नये. परंतु, त्यांनी परिस्थितीपुढे गुडघे टेकले नाहीत. आई-वडिलांचे अहोरात्र कष्ट आणि त्यांची चिकाटी पाहून हरीश यांनी मनात ठरविले होते, की एक दिवस आपल्या कुटुंबाला या दारिद्र्यातून बाहेर काढायचेच. -- व्यावसायिक पदार्पण आणि सचोटीची वाटचाल महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बांधकाम आणि विकसक क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘रेणुका असोसिएट ॲन्ड डेव्हलपर्स’ या फर्मची स्थापना करून त्यांनी व्यावसायिक जगतात स्वतःला झोकून दिले. रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायात टिकून राहणे अत्यंत आव्हानात्मक असते. विशेषतः अशा व्यक्तीसाठी ज्याच्या मागे कोणतीही कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी किंवा भांडवलाचा भक्कम आधार नव्हता. हरीश गुप्ता यांनी सुरुवातीपासूनच एक तत्त्व अंगीकारले, ते म्हणजे प्रामाणिकपणा. त्यांनी कधीही कामात तडजोड केली नाही. व्यवसायाबरोबरच त्यांनी गोरगरीब आणि गरजू लोकांना सर्वतोपरी मदत करण्याची वृत्ती कायम ठेवली. स्वतः गरिबी काय असते आणि ती कशी सोसावी लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने त्यांच्या मनात तळागाळातील घटकांविषयी प्रचंड आदर आणि कणव होती. या प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे अल्पावधीतच बाजारात त्यांची एक विश्वासू व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण झाली आणि त्यांना व्यवसायात मोठे यश लाभले. --- संकटांची वादळे, आर्थिक घसरण आणि पुनर्उभारणी यश कधीही सरळ रेषेत मिळत नाही, त्याला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. हरीश यांच्याही वाटचालीत एक असा काळ आला, जेव्हा त्यांना अत्यंत भीषण आर्थिक अडचणींनी घेरले. व्यवसायात अचानक आलेल्या मोठ्या आर्थिक संकटामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण आला. आर्थिक चणचणीमुळे कौटुंबिक पातळीवरही तणाव आणि कलह निर्माण झाला. सर्व बाजूंनी निराशा दाटून आली होती. अशा बिकट प्रसंगी हरीश यांनी खचून न जाता आपल्या नैतिक मूल्यांचा आधार घेतला. त्यांनी आजवर बाजारात कमावलेली सर्वांत मोठी संपत्ती होती विश्वास. त्यांनी बाजारातील सर्व सहकाऱ्यांना, व्यापाऱ्यांना समोरासमोर बसवून सत्य परिस्थिती सांगितली आणि त्यांच्याकडे सहकार्याची विनंती केली. त्यांच्या प्रामाणिकपणावर बाजारातील लोकांचा इतका दृढ विश्वास होता, की त्यांनी हरीश यांना दोन ते पाच महिन्यांचा अवधी दिला आणि व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी पूर्ण सहकार्य केले. लोकांच्या याच विश्वासाच्या बळावर हरीश गुप्ता यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली आणि स्वतःच्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. या प्रवासात त्यांना मानवी स्वभावाचे आणखी एक विदारक रूप पाहायला मिळाले. जेव्हा ते सामाजिक कार्यात पुढे होते, तेव्हा काही स्वार्थी आणि मतलबी मित्रांनी त्यांच्या नावाचा आणि संपर्कांचा गैरवापर केला आणि हरीश यांना मोठ्या संकटात ढकलले. परंतु, हरीश यांनी कोणतीही संतप्त प्रतिक्रिया न देता किंवा वाद न घालता अत्यंत शांतपणे अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांपासून अंतर ठेवले. या अनुभवातून त्यांनी मोठा धडा घेतला आणि ठरविले, की यापुढे केवळ आणि केवळ खऱ्याखुऱ्या गरजू व्यक्तींनाच मदत करायची; पण स्वार्थी लोकांना कधीही जवळ येऊ द्यायचे नाही. स्वतःला सावरून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कामात स्वतःला झोकून दिले. -- वादळातील सावली एखाद्या पुरुषाच्या यशामागे आणि संघर्षात त्याच्या कुटुंबाचा वाटा अनमोल असतो. हरीश गुप्ता यांच्या जीवनातील सर्वांत मोठी ताकद ठरली ती म्हणजे त्यांची धर्मपत्नी. ज्या वेळी आर्थिक नुकसानीचे वादळ आले; परंतु अशा घोर संकटाच्या काळात त्यांच्या पत्नी सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी हरीश यांच्यावरचा विश्वास कधीही ढळू दिला नाही. त्यांनी त्यांना मानसिक धैर्य दिले आणि प्रत्येक संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा दिली. म्हणूनच हरीश गुप्ता आजही अत्यंत कृतज्ञतेने आपल्या पत्नीच्या त्या त्यागाचा आणि साथीचा उल्लेख करतात. त्यांच्या दृष्टीने त्यांचे कुटुंब हेच त्यांचे सर्वस्व आहे. त्यांचा दिनक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि साधेपणाने भरलेला आहे. दररोज सकाळी उठून मनोभावे देवपूजा करणे, कुटुंबीयांबरोबर नाश्ता करणे आणि सकाळी ठीक साडेआठला आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी घरातून बाहेर पडणे, हा त्यांचा नित्यक्रम आहे. यश आणि संपत्ती मिळूनही त्यांनी आपल्या दिनचर्येतील साधेपणा आणि कामाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली आहे. -- सामाजिक बांधिलकी आणि निःस्वार्थ परतफेड जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही हरीश गुप्ता यांनी आपल्या भूतकाळातील दिवसांना कधीही विसरू दिले नाही. ज्या समाजाने आपल्याला उभे केले, त्या समाजाप्रती आपले काही देणे लागते, ही भावना त्यांच्या मनात सदैव जागी असते. ज्यांनी आपल्या कठीण काळात मदत केली, त्यांच्या पाठीशी ते कोणत्याही क्षणी, २४ तास निःस्वार्थपणे उभे राहतात. गोरगरीब, वंचित आणि गरजू व्यक्तींच्या अडचणी दूर करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. कोणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता गरजूंना सहाय्य करणे हा त्यांचा स्वभाव बनला आहे. गरिबीची कळ काय असते, हे त्यांनी स्वतः भोगले असल्याने उपेक्षित घटकांसाठी त्यांचे हात नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावलेले असतात. रस्त्याच्या कडेला बसून काकडी विकणारा एक शाळकरी मुलगा ते एक नावाजलेला यशस्वी बांधकाम व्यावसायिक, हा हरीश मथुराप्रसाद गुप्ता यांचा जीवनप्रवास म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या प्रगतीची गोष्ट नाही; तर ती मानवी इच्छाशक्ती, सचोटी, कौटुंबिक निष्ठा आणि जिद्दीची अमर गाथा आहे. संकटे कितीही डोंगराएवढी असली, तरी कष्टांची कुदळ हातात असेल तर त्या संकटांवर मात करून विजयाचा मार्ग कसा काढता येतो, हेच त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. नाशिकच्या भूमीत आपल्या घामाने यश फुलविणारे हरीश गुप्ता हे आजच्या तरुणाईसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ आणि प्रेरणास्रोत आहेत. ---कोट या व्यवसायात अफाट पैसा कमावण्याची संधी नक्कीच आहे, यात शंका नाही. परंतु, पैसा आणि यश आल्यावर डोक्यात कसलाही अहंकार शिरू देऊ नका. लक्ष्मी चंचल असते आणि हा मुळात मातीचा व्यवसाय आहे. जर तुम्ही अहंकार बाळगला, कामात खोटेपणा केला किंवा लोकांचा विश्वास गमावला, तर या मातीतून आलेला पैसा क्षणात मातीमोल व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच, स्वतःला सांभाळा, पाय नेहमी जमिनीवर ठेवा, कामात प्रामाणिक राहा आणि माणसांची कदर करा. - हरीश गुप्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT