‘बीव्हीजी’चा संप मागे; शहरात स्वच्छता सुरू
वेतन लवकर देण्याचे कंपनीचे आश्वासन; आयुक्तांच्या सूचनांनुसार कामकाजात करणार सुधारणा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन वेतन लवकर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी (ता. १६) सकाळी नऊपासून शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीतून शहराला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या अंतिम बैठकीत कामकाजातील त्रुटी दूर करून आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीचे सुमारे ५०० कर्मचारी वेतन थकल्याने कामावर आले नव्हते. परिणामी, घंटागाड्या, कॉम्पॅक्टर आणि अन्य वाहने वाहनतळावर उभी राहिल्याने कचरा संकलन ठप्प झाले होते. दोन दिवसांत शहरात सुमारे ३०० ते ४०० टन कचरा साचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
वेतनाचे आश्वासन; संप मागे
कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामगारांची बैठक घेतली. यावेळी वेतन लवकर देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर परतण्याची तयारी दर्शविली. शुक्रवारी सकाळी नऊपासून घंटागाड्यांसह अन्य यंत्रणा रस्त्यावर उतरली असून, कचरा संकलन आणि स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत.
चौकट
आयुक्तांच्या सूचनांनुसार सुधारणा
महापालिका आयुक्त आणि बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या अंतिम बैठकीत कामकाजातील त्रुटी, हजेरी नोंदी आणि जीपीएस यंत्रणेसह अन्य बाबींवर चर्चा झाली. आयुक्तांनी सुचविलेल्या सुधारणांची लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. कंपनीचे सुमारे २० कोटी रुपयांचे देयक प्रलंबित असल्याचा मुद्दाही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.