जरांगेंच्या आरोपांमागचे सत्य उघड करा
---
भुसे यांचे आव्हान; ‘तीन वर्षे गप्प का? ध्वनिचित्रफीत अचानक समोर कशी आली?’
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गंभीर आरोपांमागचे नेमके सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. २२) मांडली. आरोपांबाबत ठोस पुरावे असतील तर ते जाहीर करावेत, असे थेट आव्हान देतानाच, पोलिस यंत्रणेवर विश्वास नसेल तर न्यायालयीन चौकशीची मागणी करण्याचा जरांगे यांना पूर्ण अधिकार असल्याचे भुसे म्हणाले. अशा चौकशीसाठी आपण स्वतः पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
जरांगे-पाटील यांच्याकडे या प्रकरणाची माहिती आधीपासून होती, तर त्यांनी तीन वर्षांपूर्वीच ती समोर का आणली नाही? आता अचानक ही माहिती कोणी दिली आणि ध्वनिचित्रफीत समोर आणण्यामागे कोण आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे, असा सवाल भुसे यांनी उपस्थित केला. केवळ आरोप-प्रत्यारोपांवर न थांबता या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे सांगत भुसे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची बाजू घेतली. या दोघांनीही असे कोणतेही कृत्य केलेले नाही, असा ठाम दावा त्यांनी केला.
‘हा शिवसेना विरुद्ध भाजपचा विषय नाही’
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श म्हणजे सर्व समाजघटकांना सोबत घेऊन वाटचाल करणे. आमचे सरकारही त्याच विचाराने काम करीत असल्याचे भुसे म्हणाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणाचे आंदोलन झाले होते. त्या वेळी जरांगे- पाटील यांच्याशी सकारात्मक वातावरणात चर्चा झाली होती. मग आता अचानक ही ध्वनिचित्रफीत समोर कशी आली, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा विषय शिवसेना विरुद्ध भाजप असा रंगविणे चुकीचे असल्याचे सांगत, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक असल्याचेही भुसे यांनी नमूद केले.
कुंभमेळ्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांना निमंत्रण
त्र्यंबकेश्वर-नाशिक सिंहस्थ-कुंभमेळा नियोजनाबाबत बोलताना भुसे यांनी हिंदुत्वावर निष्ठा असलेल्या सर्व व्यक्ती आणि संघटनांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
चौकट
शिंदे २६ ला नाशिक दौऱ्यावर
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २६ ऑक्टोबरला नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येईल. तसेच, जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.