नाशिक

डोंगराळे प्रकरणातील नराधम शेखर खैरनारला फाशीची शिक्षा; न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत

CD
फोटो -16111 मालेगाव : शिक्षेबाबत प्रसारमाध्यमांना शुक्रवारी माहिती देताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम. शेजारी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व अन्य विधिज्ञ. --- बालिका अत्याचार प्रकरणात नराधम शेखरला फाशीची शिक्षा --- पीडित कुटुंबीयांना दहा लाखांची मदत देण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १६ : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचारवर्षीय बालिका अत्याचार व खून प्रकरणी नराधम आरोपी शेखर ऊर्फ विजय संजय खैरनार (वय २५) याला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी शुक्रवारी (ता. १६) फाशीची शिक्षा सुनावली. अपहरण व पुरावे नष्ट करणे या दोन्ही गुन्ह्यांत प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. न्यायालयाने राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेंतर्गत पीडित कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले. न्यायदेवतेने आरोपीला दिलेल्या फाशीच्या शिक्षेचे मालेगाव परिसर वासीयांतर्फे स्वागत करण्यात आले. पीडित कुटुंबीयांनीही शिक्षेबाबत समाधान व्यक्त केले. डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर २०२५ ला चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी शेखर ऊर्फ विजय खैरनार याला अटक केली होती. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते. मोर्चे, आंदोलने करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जनभावना लक्षात घेऊन शासनाने सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची खटल्यासाठी नियुक्ती केली आहे. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पालदेवार यांच्यासमोर झाली. न्यायालयाने आरोपी शेखर खैरनारला ३० सप्टेंबरला दोषी ठरविले होते. जन्मठेप की फाशी याबाबत उत्सुकता होती. सकाळी पावणेअकराच्या सुमारास विशेष सरकारी वकील निकम न्यायालयात आले. न्यायालयात वकील, पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. आरोपी शेखर व त्याचे वकील ‘व्हीसी’द्वारे न्यायालयात हजर होते. न्यायाधीश पालदेवार यांनी अकरा वाजून पाच मिनिटांनी निकालपत्र वाचण्यास सुरुवात केली. न्यायालयाने आरोपीला तुला फाशीची शिक्षा देण्यात येत असल्याचे सांगितले. यावर आरोपी व त्याच्या वकिलाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही. न्यायालयाने पुन्हा आरोपीला तुझ्याजवळ असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला बोलव, असे सांगितले. पोलिस कर्मचारी आल्यावर न्यायालयाने पुन्हा आरोपीला तुला फाशीची शिक्षा देत आहे. तसेच, तुला उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत असल्याचे सांगितले. यासंदर्भात नाशिक रोड येथील तुरुंगाधिकाऱ्यांना इ-मेलद्वारे निकालाची कागदपत्रे पाठवत आहे, त्यावर आरोपीची सही घेऊन ती पुन्हा न्यायालयात जमा करावीत, असेही न्यायाधीशांनी सांगितले. शिक्षा सुनावल्यावर आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव व पश्‍चाताप नव्हता. तो निगरगट्टपणे न्यायाधीशांचे म्हणणे ऐकत होता. निकाल जाहीर झाल्यावर न्यायालयाने पीडित कुटुंबीयांना बोलावले. पीडितेचे आजोबा, काका व वडिलांना न्यायाधीशांनी शिक्षेबाबत माहिती दिली. त्यांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयाने पीडित कुटुंबीयांना दहा लाखांची मदत देण्याचे आदेश दिले. निकालानंतर ॲड. निकम यांनी न्यायालयाचे आभार मानले. तसेच, नागरिकांनी शांततेत घरी जावे, असे आवाहन केले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह विधिज्ञांनी ॲड. निकम यांचे अभिनंदन केले. या वेळी येथील सरकारी वकील संजय सोनवणे, मूळ फिर्यादीच्या वकील स्नेहा शर्मा-ठाकरे, ॲड. हर्षद तिवारी, मालेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुधाकर निकम यांच्यासह वकील उपस्थित होते. न्यायालय आवारात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT