पान चार
------------------
13290
दुसाने (ता.साक्री) : दिंडीचालक भट्टु महाराज पाठक यांच्या नेतृत्वाखाली सप्तशृंगगडाकडे कावड घेऊन मार्गक्रमण करणारे श्री सप्तशृंगी देवी पदयात्री सेवा मंडळाचे कावडधारी.
कोजागिरीला सप्तशृंगीगडावर सर्वांत मोठी ''कावड यात्रा''
कावडधारी पदयात्री दाखल होण्यास सुरुवात; ३८० बसेसचे नियोजन, नांदुरी-गड मार्ग खासगी वाहनांसाठी बंद
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. २१ : सप्तशृंगीगडावर रविवारी (ता. २५) कोजागिरी पौर्णिमा उत्सव व राज्यातील सर्वांत मोठ्या कावड यात्रेचा भक्तिमय सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने तृतीयपंथीय समुदायाची पारंपरिक छबीना मिरवणूकही काढण्यात येणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व कर्नाटक या राज्यांतील हजारो कावडधारक विविध पवित्र नद्यांचे जल घेऊन नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर दाखल झाले आहेत. या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, सप्तशृंगी देवी न्यास, ग्रामपंचायत आणि एसटी महामंडळाने नियोजन केले आहे.
आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता भाविकांना कोजागिरी पौर्णिमा उत्सव व कावड यात्रेचे वेध लागले आहेत. चैत्रोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेच कोजागिरी पौर्णिमेच्या यात्रेतही दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे.
--------
शेकडो किलोमीटरचा अनवाणी प्रवास
पुणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा व असलोद येथून तापी नदीचे, ओंकारेश्वर व इंदूर येथून नर्मदा नदीचे, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे, तर भीमाशंकर येथून भीमा नदीचे पवित्र जल घेऊन कावडीधारक सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करत आहेत. सुमारे चारशे ते सहाशे किलोमीटरचा खडतर अनवाणी प्रवास करून अनेक कावडीधारक गडापासून १५० ते २०० किलोमीटरच्या परिसरात पोहोचले आहेत. नाशिक जिल्ह्यातील हजारो कावडधारक त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले आहेत. तेथील कुशावर्त तीर्थावरून कलशात पवित्र जल भरून शुक्रवारपासून ते सप्तशृंगीगडाकडे प्रस्थान करतील. तसेच नाशिक येथील रामतीर्थातूनही हजारो कावडधारक गोदावरीचे जल घेऊन गडाकडे कूच करणार आहेत.
-------
वाहतुकीसाठी ३८० बसेसचे नियोजन
कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवार (ता. २४) ते सोमवार (ता. २६) या कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड दरम्यानचा मार्ग खासगी वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी नांदुरी ते सप्तशृंगगड दरम्यान १३० बसेस, तसेच नाशिक विभागातील ११ आगारांतून सुमारे २५० बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.