लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्यांविरुद्ध तीन गुन्हे दाखल
---
विनापरवानगी आंदोलन, वाहतूक अडवणूक, अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोखल्याच्या तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्ता अडवून विनापरवानगी आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्यापासून रोखण्याचा प्रयत्न, अशा विविध तक्रारीवरून लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चातर्फे काढण्यात आलेला मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन आणि शहरातील रास्ता रोको आंदोलन प्रशासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणारे ठरले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात लोकसंघर्ष मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन धांडे यांच्यासह अन्य आंदोलकांविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
पहिला गुन्हा : आदेशाचे उल्लंघन
सोमवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमावबंदी आदेश आणि प्रशासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून धरणे व ठिय्या आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी संदीप परदेशी तपास करीत आहेत.
दुसरा गुन्हा : शांततेचा भंग
बुधवारी (ता. १४) आंदोलकांतर्फे आकाशवाणी चौक आणि स्वातंत्र्य चौकात रास्ता रोको आंदोलन करून सार्वजनिक वाहतूक व शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक भारत चव्हाण तपास करीत आहेत.
चौकट
कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्याचा गुन्हा
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक भगवान राजाराम कासारे व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखून धक्काबुक्की केल्याप्रकरणी व गेटवरच अडवून धरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शरद शेवाळे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.