भुसावळ येथील ब्राह्मण संघात
अष्टमीनिमित्त महालक्ष्मी पुजन
----
उद्या विविध कार्यक्रमांत सहभागाबाबतचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १६ : येथील ब्राह्मण संघात शारदीय नवरात्रोत्सवाच्या अष्टमीनिमित्त येत्या रविवारी (ता.१८) श्री महालक्ष्मी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांना भक्ती, श्रद्धा व सांस्कृतिक परंपरेचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
रविवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्री महालक्ष्मी पूजनाचा, सायंकाळी सातला श्री महालक्ष्मीची आरती व त्यानंतर पारंपरिक पद्धतीने घागरी फुंकण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांच्या सहभागातून स्वयंस्फूर्त अभंग, भजन व गीत गायनाच्या कार्यक्रमात भक्तिगीतांच्या माध्यमातून देवीचा जागर होणार आहे. विविध परंपरा व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत करण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे. ब्राह्मण संघात दरवर्षी परंपरेनुसार नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदाही अष्टमीनिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रथेप्रमाणे रात्री बाराला श्री महालक्ष्मीची आरती करून संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल. तरी भुसावळ शहरातील सर्व भाविक, समाजबांधव व भगिनींनी सहकुटुंब उपस्थित राहून श्री महालक्ष्मीच्या दर्शनाचा व या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर, सचिव शंभू गोडबोले व कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.