सर्व प्रकारचे परीक्षा शुल्क सरसकट माफ
(उपशीर्षक)
उदय सामंत यांची माहिती; दरआठ दिवसांनी आढावा घेण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने सरसकट सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. त्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री सामंत यांनी सांगितले, की राज्य शासनाने यापूर्वी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यात ४० तालुके आणखी वाढले असून, आता ३०५ तालुके दुष्काळग्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंका दूर केल्या असून, सरसकट परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा-महाविद्यालयात असे होत नसेल, तर विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून द्यावे. यावर योग्य ती कारवाई केली जाईल. याबाबत दरआठ दिवसांनी आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीबाबत आणि विद्यार्थी शैक्षणिक कर्जमाफीबाबत कोणी त्रास देत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जळगाव एमआयडीसीला ‘डी प्लस’ दर्जा
जळगावच्या एमआयडीसीला ‘डी प्लस’ दर्जा मिळावा याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व आमदारांची आग्रही मागणी होती. त्यानुसार ‘डी प्लस’ दर्जा देण्याबाबत शासन आदेश काढले आहेत. उद्योगवाढीसाठी आढावा घेऊन उद्योग विभागामार्फत काय मदत करता येईल, यासाठी मीटिंग लावणार, तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये उद्योगांना पाण्याची समस्या उद्भवू शकते. यामुळे काय मदत करता येईल, याचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
विरोधक केवळ बोंबाबोंब करतात
दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, विरोधक बोंबाबोंब करीत आहेत. शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश पोहोचवून त्यांना नाराज करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला.
चौकट
खानदेशी साहित्य संमेलनासाठी २५ लाख
मराठी साहित्य संमेलन नागपूरला आयोजित केले असून, विश्व मराठी संमेलन विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी भरविले जाणार आहे. तसेच खानदेशी साहित्य संमेलन दर वर्षी आयोजित केले जाणार असून, यासाठी २५ लाख रुपयांचा निधी राहणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.