NSK26H33560
नाशिक : ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये शंखनाद ची नोंद झाल्यानंतर वादकांसमवेत आनंदोत्सव साजरा करताना पालकमंत्री गिरीश महाजन, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखरसिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी. (छायचित्र केशव मते)
---------------
कोजागिरीच्या मुहूर्तावर शंखनादाने दुमदुमला गोदाकाठ
----------------
गिनीज बुक वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद ः कुंभमेळ्याच्या मंगलपर्वाची आध्यात्मिक नांदी
गोदातिरावर ५१७ शंखांचा एकतालात ध्वनी, भक्तिरसात न्हाले देवमामलेदार पटांगण
----------------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२५ : सूर्य मावळतीकडे झुकत असताना गोदाघाटावर जमलेली गर्दी, कार्यक्रमस्थळी सुरू असलेली कार्यकर्त्यांची लगबग, शंखनादासाठी सज्ज झालेले साधक आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी मनामनात जागलेला उत्साह... अशा भक्तिमय वातावरणात कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळी गोदातीरावरील देवमामलेदार पटांगण परिसर एका ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले. ५१७ शंखवादकांच्या सामूहिक शंखनादाने गोदातीर दुमदुमून गेला. शंखांच्या निनादातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वारंभाची मंगल चाहूल अन आध्यात्मिक नांदी अनुभवायला मिळाली. या सामूहिक शंखनादाने विश्वविक्रमावर नाशिकचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी विश्वविक्रमाची घोषणा करताच नाशिककरांनी एकच जल्लोष केला.
-----------
पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि गुणगौरव न्यास संचलित अनंतविजय शंखनाद पथक आयोजित उपक्रमासाठी सायंकाळपासूनच परिसरात धावपळ सुरू होती. सहभागी शंखवादकांची नोंदणी, उपस्थितीची पडताळणी, शंखांची व्यवस्था आणि कार्यक्रमाचे नियोजन यामध्ये आयोजक व स्वयंसेवक व्यग्र होते. प्रत्येक व्यवस्था वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. धार्मिक परंपरेचा जागर आणि विश्वविक्रमाचा प्रयत्न अशा दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाकडे नाशिककरांचे लक्ष लागले होते.
१६-१
शंखनाद, संकल्पाचे प्रतीक
जगन्नाथपुरी, चेन्नईहून मागविण्यात आलेल्या शंखांसह ५१७ जणांच्या सहभागातून सामूहिक शंखनाद करण्याचे नियोजन करण्यात आले होते. निर्धारित वेळ जवळ येताच कार्यक्रमस्थळावरील उत्सुकता वाढत गेली. शंखनादासाठी सज्ज झालेले सहभागी, त्यांच्यातील समन्वय आणि या उपक्रमासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्ते यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शंखनादाचा गगनभेदी स्वर हा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामूहिक संकल्पाचे प्रतीक आहे. मंदिरांतील मंगलप्रसंगापासून धार्मिक उत्सवांपर्यंत शंखनादाला विशेष महत्त्व आहे.
१६-१
अन विश्वविक्रमाची घोषणा
याच परंपरेला आधुनिक काळात व्यापक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. प्रारंभी प्राणायामाने शंख फुंकण्यासाठी तयारी करण्यात आली. ‘गजानना गजानना बाप्पा बाप्पा गजानना’, ‘इंद्रजिमी जंभ पर...’, ‘जय भवानी... जय शिवाजी’ असा जयघोष करण्यात आला. विश्वविक्रमाची घोषणा झाल्यानंतर नाशिककरांनी एकच जल्लोष केला.
१६-१
यापूर्वी ३०३ शंखनादचा विक्रम
शंखनादाचा उपक्रम नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाची ताकद जगासमोर येते, अशी भावना पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केली. गिनिज बुकचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी नोंदप्रक्रियेची माहिती दिली. यापूर्वी एकाच वेळी सर्वाधिक शंखनादाचा रेकॉर्ड अमेरिकेमध्ये ३०३ जणांनी केला होता. हा रेकॉर्ड गोदातिरावरील ५१७ शंखनादाने मोडीत काढला आहे. ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीचा हा उपक्रम कुंभपर्वाच्या वातावरणनिर्मितीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. शंखनादानंतर गोदा आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.