तरुणीचा पाठलाग
करून छेडछाड
नाशिक : अमृतधाम परिसरात एका तरुणीचा सतत पाठलाग करून, धमक्या देऊन आणि गाडीची चावी काढून घेऊन छेडछाड करणाऱ्या संशयितांविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंश मरकड (रा. बिडी कामगारनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयित काही महिन्यांपासून तरुणीचा पाठलाग करत होता व लग्नासाठी दबाव टाकत होता. २० सप्टेंबरला तरुणी फुले घेण्यासाठी आली असता संशयिताने तिच्या गाडीची चावी काढून हात पकडून ढकलून दिले.
--
बस डेपोत एकावर
प्राणघातक हल्ला
नाशिक : तपोवन येथील सिटीलिंक बस डेपोत दारूच्या नशेत दोघांनी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात वीट फोडून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. राजाराम केरू घाटोळ (३८, रा. घाटोळ गल्ली, सातपूर) हे डेपोत असताना संशयित रविकांत बाळासाहेब भारती (४०, रा. लोणार लेन, रविवार कारंजा), दीपक रामचंद्र जाधव (३२, रा. सिंहस्थनगर, सिडको) यांनी त्यांना शिवीगाळ करत डोक्यात वीट मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आडगाव ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
विवाहितेचा छळ
नाशिक : नाशिकच्या एका विवाहितेचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेचे २९ मे २०२१ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर पती अभिषेक आणि सासरच्या अन्य चार सदस्यांनी तिला वेळोवेळी मारहाण करून त्रास दिला. अखेर पीडितेने पंचवटी ठाण्यात तक्रार नोंदवली असून पती, सासू, सासरे व दोन नणंदांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--
वाहनाच्या धडकेत नुकसान
नाशिक : अंबड ठाण्याच्या हद्दीतील अन्नपूर्णा हॉटेलसमोर नेक्सॉन कारने मर्सिडीज कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर पाठीमागून आलेल्या वॅगनआर कारचीही नेक्सॉनला धडक बसली. रोहित राजू शिंदे (३८, रा. शरणपूर, कॅनडा कॉर्नर) हे मर्सिडीज कारने (एमएच १५ एचयु ३७९८) जात असताना समोरून आलेल्या नेक्सॉन कारने (एमएच १५ केके ५६११) त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात मर्सिडीज आणि वॅगनआर गाडीचे मोठे नुकसान झाले. अंबड पोलिसांनी नेक्सॉन चालक सचेतन सतीश आहेर (३०, रा. सिडको) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---
त्रासाला कंटाळून
विवाहितेची आत्महत्या
नाशिक : श्रमिकनगर भागात माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून पती व सासूकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तेजस्विनी मयूर कर्डक, असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील प्रदीप जालिंदर भालेराव (रा. पांढुर्ली, सिन्नर) यांनी तक्रार दिली. पोलिसांनी संशयित पती मयूर अनिल कर्डक व सासू प्रमिला अनिल कर्डक यांच्याविरुद्ध सातपूर ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
--
ऑनलाइन फसवणूक
नाशिक : ऑनलाइन प्रॉडक्ट विक्रीचे आमिष दाखवून एका महिला व्यावसायिकाची ५९ हजार ६२५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नसरीन मुस्ताफा काचवाला (५४, रा. टाकळी रोड, द्वारका) यांच्या तक्रारीनुसार, संशयित नम्रता रमोला (रा. मीरा रोड, मीरा भाईंदर) हिने प्रॉडक्ट विक्रीच्या बहाण्याने त्यांच्याकडून वेळोवेळी ५९ हजार ६२५ रुपये उकळले व ते परत न करता विश्वासघात केला. मार्च ते जुलै २०२६ दरम्यान सदरचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी इंदिरानगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.