सिंहस्थासाठी नाशिकला ‘आपत्ती सुरक्षाकवच’
दहा महापालिकांमध्ये स्वतंत्र प्राधिकरण; भाविकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणांमध्ये समन्वय साधणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्तींचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने नाशिकसह राज्यातील दहा महापालिकांमध्ये स्वतंत्र शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर, आग, चेंगराचेंगरी यांसारख्या आपत्तींचा सामना करण्यासह महापालिका, पोलिस, आरोग्य व अग्निशामक यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर असणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ४१-अ अंतर्गत ही रचना करण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल यांनी याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
दहा महापालिकांचा समावेश
बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, पिंप्री-चिंचवड, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या महापालिकांमध्ये पहिल्या टप्प्यात प्राधिकरण स्थापन होणार आहे. दाट लोकवस्ती आणि आपत्तींच्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंहस्थात कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेवर लक्ष
सिंहस्थ कुंभमेळ्याला ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने प्रारंभ होणार आहे. २०२६-२७ च्या पर्वकाळात चार ते पाच कोटींहून अधिक भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. या प्रचंड गर्दीचे नियोजन करताना संभाव्य आपत्तींचा वेळीच मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
पूर, आग, इमारत कोसळणे, साथीचे रोग, गॅसगळती, रासायनिक दुर्घटना, वाहतूक कोंडी आणि चेंगराचेंगरी अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचे प्रतिबंधात्मक नियोजन, पूर्वतयारी आणि तातडीचा प्रतिसाद ही प्राधिकरणाची प्रमुख कामे असतील. आपत्तीच्या काळात विविध विभागांतील समन्वयाचा अभाव दूर करून मदतकार्य अधिक वेगाने राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
आयुक्त अध्यक्ष, जिल्हाधिकारी उपाध्यक्ष
संबंधित महापालिका आयुक्त हे प्राधिकरणाचे अध्यक्ष, तर जिल्हाधिकारी उपाध्यक्ष असतील. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे उपायुक्त सदस्य-सचिव म्हणून काम पाहतील. पोलिस, प्रादेशिक विकास प्राधिकरण, अग्निशामक, विद्युत, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य आणि माहिती व जनसंपर्क विभागांचे प्रमुख सदस्य असतील. अशा एकूण दहा सदस्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
या प्राधिकरणामुळे नाशिकच्या दैनंदिन आपत्ती व्यवस्थापनाला बळ मिळण्यासह सिंहस्थ काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणांमध्ये एकसंध समन्वय साधण्यास मदत होणार आहे.