महापालिका इमारत घेणे
----------------
महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
३१ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कमी मनुष्यबळात काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेत महापौर हिमगौरी आडके यांनी यंदाच्या दिवाळीसाठी ३१ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
महापालिका आस्थापनेवरील कायमस्वरूपी कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्यसेविका, सेविका आणि मदतनीस, सफाई कर्मचारी, बूस्टर पंपिंग आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांसह सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. महापालिकेच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांना ३१ हजार ५०० रुपये तर शासनाच्या अनुदानातून वेतन घेणाऱ्या सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना ७० टक्के प्रमाणे २२ हजार ५० रुपये अनुदान मिळणार आहे.
गेल्या वर्षी महापालिकेने २३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. यंदा त्यात थेट ८ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यंदा २०२६ मध्ये म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेने ३१ हजार रुपये तर भाजप प्रणीत कर्मचारी संघटनेने ३१ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. राष्ट्रवादीच्या गटनेत्या सीमा ठाकरे, भाजप गटनेते ॲड. श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते आणि सुधाकर बडगुजर यांनीही ३१ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. त्यानुसार महापौरांनी ३१ हजार ५०० रुपयांची घोषणा केली.
शासन अनुदानातून मानधन घेणाऱ्या क्षयरोग नियंत्रण, हिवताप व एड्स नियंत्रण सोसायटी, बूस्टर पंपिंग स्टेशन, समग्र शिक्षा अभियान, एन.यु.एच.एम., एन.यु.एल.एम., आशा कर्मचारी, युनिसेफ तसेच सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५० रुपये मिळणार आहेत.
या अनुदानासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात १६ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र अनुदानात वाढ झाल्याने महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे २२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल एस-१७ व त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच हे अनुदान लागू असल्याने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अधीक्षक अभियंता, शहर अभियंता, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि साहाय्यक आयुक्त यांना हे अनुदान मिळणार नाही.
महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत कमी मनुष्यबळ असूनही सुरू असलेले काम व कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी या चांगल्या कामांची पावती म्हणून ३१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
- हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक.