निमंत्रण पत्रिकेवर समुद्रमंथनाची प्रतिकृती
सिंहस्थ प्राधिकरण : बॉक्समध्ये गोदावरीच्या जलासह आकर्षक वस्तू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यास ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बुधवारी (ता. २१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ध्वजारोहण सोहळ्याची निमंत्रणपत्रिका देण्यात आली. ही निमंत्रणपत्रिका आकर्षक बॉक्समध्ये तयार करण्यात आली आहे. बॉक्सवर समुद्रमंथनाची प्रतिकृती असून, आतमध्ये सिंहस्थाची महती सांगणारी पुस्तिका आणि आकर्षक वस्तूंची सजावट करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा निमंत्रण पत्रिकेवर समुद्रमंथनाची प्रतिकृती कोरण्यात आली आहे. निमंत्रणपत्रिका उघडल्यानंतर समुद्र मंथनावेळी नाशिकच्या रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडात पडलेले अमृताचे दोन थेंब दाखविण्यात आले आहे. पत्रिकेवर ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर तसेच पंचवटीतील श्री काळाराम मंदिराची प्रतिकृती आहे. तसेच खळाळती गोदावरी नदी व नदीत उभे राहून सूर्यदेवाला अर्घ्य देणारा साधू असे चित्र साकारण्यात आले आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची महती सांगणारी पुस्तिकाही बॉक्समध्ये आहे. या पुस्तिकेवर गंगा गोदावरी मातेचे छायाचित्र आहे. तसेच बॉक्समध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची छायाचित्रे असलेल्या निमंत्रण पत्रिकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बॉक्समध्ये मगरीवर आरूढ गोदावरी माता, पितळी घंटी, गोदावरीचे जल असलेले पितळी कमंडलू व पितळी छोटी डबी आहे. रुद्राक्षाच्या दोन जपमाळ असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा नामोल्लेख व बोधचिन्ह असलेल्या वस्त्राचा समावेश आहे. सिंहस्थाचे बोधचिन्ह असलेला बॅच व मिठाईदेखील या बॉक्समध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या निमंत्रण पत्रिकेचे वेगळेपण अधिक ठळकपणे नजरेत भरते.
मान्यवरांंना निमंत्रण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ३१ ऑक्टोबरच्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच केंद्र-राज्यातील महत्त्वाचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाही या सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.