मुख्य अंक पान--३
---------------
DNR26B14716
सप्तशृंगगड ः शारदीय नवरात्रोत्सवातील सहाव्या माळेला शुक्रवारी आदिमायेची जांभळ्या रंगाचे महावस्त्र, सुवर्ण अलंकारासह व विविध फुले-पानांच्या आरास करीत घातलेली पूजा.
----------------
कात्यायनी रूपात आदिशक्तीचे मनोहारी दर्शन
सप्तशृंगगडावर सहाव्या माळेला उसळला भक्तीचा जनसागर
----------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १६ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याचा अपूर्व संगम अनुभवायला मिळाला. आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेच्या कात्यायनी रूपाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच गडावर भाविकांची रीघ लागली होती. ‘श्री सप्तशृंगी मातेचा उदो उदो’ आणि ‘अंबे माता की जय’ या जयघोषाने अवघा गड भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवीच्या पारंपरिक उपासनेला धार्मिक विधींची पवित्र जोड लाभल्याने सहाव्या माळेचा उत्सव अधिकच मंगलमय झाला.
-----------------
नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची आराधना केली जाते. दुर्गाशक्तीचे तेजस्वी प्रतीक मानल्या जाणाऱ्या या स्वरूपाच्या पूजनातून भक्तांना सामर्थ्य, धैर्य आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळते, अशी श्रद्धा आहे. या भावनेतून महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांतून आलेल्या भाविकांनी सप्तशृंगीमातेच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. सहाव्या माळेची पंचामृत महापूजा खासदार भास्कर भगरे आणि देणगीदार भाविक ॲड. सचिन देशमुख यांच्या हस्ते झाली. विश्वस्त संस्थेतर्फे शेगाव येथील भाविक पुरुषोत्तम निंबाळकर यांनाही महापूजेवेळी उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली. सकाळी सात ते नऊ या वेळेत देवीला विशेष अलंकारांनी सजविण्यात आले. भरजरी जांभळ्या रंगाचे वस्त्र, पारंपरिक दागिने आणि मनोहारी साजशृंगार यामुळे आदिशक्तीचे रूप अधिकच विलोभनीय दिसत होते. देवीचे दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव ओसंडून वाहत होता. सहाव्या माळेचे औचित्य साधून दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते देवीची महानैवेद्य आरती करण्यात आली. उपस्थित भाविकांनी आरतीत सहभागी होत मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.