नवरात्रीच्या वर्गणीसाठी
एकास ठार मारण्याची धमकी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथील नेक्स्ट झेन टायर हाऊस या दुकानात नवरात्रीची वर्गणीची मागणी करीत व्यवस्थापकास शिवीगाळ करीत, दुकानाची तोडफोड व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात संशयित सुरज पगारे (२६) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (ता. १२) सायंकाळी संशयित पगारे नवरात्री उत्सवासाठी १५ हजार रुपयांच्या वर्गणीच्या मागणीसाठी दुकानात गेला. दुकानातील व्यवस्थापक विजयसिंग राजपुरोहित यांनी त्यास टाळले असता, त्याने तुमचे दुकान जोरात चालते, वर्गणी द्यावीच लागेल. पैसे दिले नाहीत तर दुकानाची तोडफोड करीन. तुझ्या शेठला मारून टाकीन, अशी धमकी दिली. राजपुरोहित याने संचालक सुमित चांदमल बोरा (वय ५१, रा. रविवार कारंजा) यांना फोनवरून माहिती दिली असता, बोरा यांनी लगेचच ‘डायल ११२’ यावर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित सुरज पगारे याला ताब्यात घेतले.
तर, संशयित पगारे याने बाहेर आल्यानंतर जीवे मारण्याची धमकी राजपुरोहित यांना दिली. त्यामुळे त्याने फिर्याद देण्यास नकार दिला असता, बोरा यांनी स्वतः सरकारवाडा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार, सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.