राज्यभरात आज जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा होणार
वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण; विविध उपक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा. भल्या पहाटे उठून वर्तमानपत्रांचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे, विविध वाहतूक यंत्रणेमार्फत ही दैनिके वाचकांना घरपोच करावयाची, हा वृत्तपत्र विक्रेत्यांचा नेहमीचा दिनक्रम.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे सर्वसामान्य वाचकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वर्तमानपत्रे, पहाटेच त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम ते नित्यनेमाने करीत असतात. तेही, ऊन, पाऊस, वारा, थंडी यांची कोणतीही तमा न बाळगता. या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिवस. आपल्या कष्टाचा गौरव करणारा हा अभिमानाचा दिवस असल्याच्या त्यांच्या भावना आहेत.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस. २०१७ पासून ‘सकाळ’तर्फे वृत्तपत्र विक्रेता साजरा करण्यास सुरुवात केली. डॉ. कलाम हे एक थोर शास्त्रज्ञ म्हणून सर्वांना परिचित आहेतच, मात्र त्यांनी शालेय जीवनात, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी वृत्तपत्र वाटपाचे कामकाजही केले होते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. डॉ. कलाम यांनी त्यांच्या ‘विंग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. त्यांचा हा स्वावलंबी शिक्षणाचा वसा व वारसा पुढे चालविण्यासाठी हा दिवस विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला होता. गेली अनेक वर्षे वृत्तपत्र विक्रेता या नात्याने हे विक्रेते वृत्तपत्र विक्रीची अखंड सेवा देत आहेत. त्याचबरोब संस्कृतीत वाढ व्हावी, म्हणून नवनवीन प्रकाशने वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा नेहमीचा प्रतिसाद असतो. याबद्दल सर्वसामान्य वाचकांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.
ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्याच्या विविध भागातील अंक विक्री केंद्रांवर, आज विक्रेता दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. यानिमित्त विविध दैनिकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच त्यांच्यासोबत एकत्रित केक कापणे, त्यांना गुलाबपुष्प, पेढे व मिठाई यांचे वाटप इत्यादी माध्यमातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्त राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे विविध संघ, संघटना व पदाधिकारी यांच्याकडून विक्रेत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
कोट
शासनाने वृत्तपत्र विक्रेता महामंडळ घोषित केले आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, हीच वृत्तपत्र विक्रेत्यांना दिनाच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा ठरेल.
-चंद्रकांत पवार
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी प्रतिकूल परिस्थितीत वृत्तपत्र विकून शिक्षण घेतले आणि पुढे देशाचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून लौकिक मिळविला. त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या सर्व बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
-सुनील मगर
पहाटे उठून समाजापर्यंत सत्य माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे पवित्र कार्य वृत्तपत्र विक्रेते करतात. त्यांच्या मेहनतीला आणि सेवाभावाला मानाचा मुजरा!
-दत्ता ठाकरे
ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणून घराघरांत माहिती पोहोचवतात. डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असला, तरी छापील वृत्तपत्रांचे महत्त्व कायम आहे. विक्रेत्यांच्या आर्थिक अडचणी दूर करून त्यांच्या कल्याणासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत.
-राजू अनमोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.