पान एक
-------
14927, 14924
ओझर : टायर फुटल्याने दुभाजकावर जावून आदळलेली बस. दुसऱ्या छायाचित्रात जखमी प्रवासी यांची विचारपूस करताना आमदार दिलीप बनकर.
ओझर-पिंपळगाव मार्गावर शिरपूर-नाशिक बसला अपघात
टायर फुटल्याने बस दुभाजकावर आदळली; ४ ते ५ प्रवासी जखमी
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता २१: ओझर-पिंपळगाव महामार्गावरील एचएएल कंपनीसमोरील उड्डाणपुलावर शिरपूर डेपोच्या नाशिककडे जाणाऱ्या बसचे (एमएच १५ जेसी ८३३१) अचानक टायर फुटल्याने अपघात झाला. दुपारी अडीचला हा अपघात झाला. टायर फुटल्यामुळे बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन महामार्गाच्या मधोमध असणारे विजेचे खांब तोडत थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात बस अडकून बसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात बसमधील ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
शिरपूर डेपोची बस ४९ प्रवासी घेवून नाशिककडे येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर-पिंपळगाव महामार्गावरील एचएएल कंपनीसमोरील उड्डाणपुलावर येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दुभाजकावर जावून आदळली. या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
अपघाताची भीषण माहिती मिळताच आमदार दिलीप बनकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संपूर्ण अपघाताची परिस्थिती समजून घेत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विचारपूस केली व त्यांना धीर दिला. यादरम्यान, लांब पल्ल्याच्या बस (लालपरी) अत्यंत वेगात सुसाट धावत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राथमिक माहितीनुसार, बसचा टायर फुटल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातामुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.