लोगो घेणे
फोटो : केशव मते
रॉक बॅन्डच्या तालावर थिरकली तरुणाई
---
‘सकाळ गरबा फेस्ट २६’ रंगला; लोकप्रिय गीतांवर ठेका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : आकर्षक रोषणाईचा झगमगाट, रॉक बॅन्डच्या ठेक्यांवर घुमणारी गरब्याची गाणी, घागरा- चोली आणि राजस्थानी, जोधपुरी वेशभूषेत सजलेली तरुणाई, हातात रंगीबेरंगी दांडिया अन् तालावर ताल धरत गोलाकार फिरणारी पावले... अशा उत्साहपूर्ण वातावरणात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘सकाळ गरबा फेस्ट २६’ रंगला.
गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणाऱ्या तरुण-तरुणींनी रविवारी (ता. १८) अवघे लोटस लॅन्ड बॅक्वेट ॲन्ड लॉन्स उत्साहाने भारून टाकले. पारंपरिक गुजराती लोकसंस्कृतीचा साज आणि आधुनिक संगीताचा जल्लोष यांचा सुरेख संगम या महोत्सवात अनुभवायला मिळाला. नवरात्रोत्सवात गरबा- दांडियाचे तरुणाईत विशेष आकर्षण असते. त्याचीच प्रचीती ‘सकाळ गरबा फेस्ट २६’मध्ये आली. रॉक बॅन्डच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. लोकप्रिय गरबा गीते व दांडियाच्या ठेक्यांवर सहभागी तरुणाईने ताल धरला. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या तरुणींच्या घागऱ्यांच्या रंगांची उधळण, तरुणांचा जोधपुरी पोशाख आणि प्रकाशझोतांनी उजळलेले वातावरण यामुळे महोत्सवाला खास रंगत आली. गरब्याच्या फेरात रमलेले सहभागी, संगीताच्या तालावर एकसुरात पडणारी पावले आणि प्रत्येक गाण्यागणिक वाढणारा उत्साह यामुळे उत्सवाचा माहोल अधिकच खुलला. नवरात्रोत्सवानिमित्त मित्रपरिवारासह गरबा-दांडियाचा आनंद लुटण्याची संधी मिळाल्याने तरुणाईत विशेष उत्साह दिसून आला.
---चौकट
परंपरा अन् आधुनिकतेची सांगड
परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत साजऱ्या झालेल्या या महोत्सवाने नवरात्रोत्सवाच्या आनंदात आणखी भर घातली. ‘सकाळ गरबा फेस्ट २६’ला टीजीएल, मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट, कौशल्या लिव्हर ॲन्ड गॅस्ट्रो क्लिनिक, वक्रतुंड हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रायते पाटील पॅरालाइज रिहॅबिलिटेशन सेंटर आणि लोटस लॅन्ड यांचे सहकार्य लाभले. ४४० हर्टझ हे ब्रॅन्ड पार्टनर, तर स्पायडर मीडिया हाउस इव्हेंट पार्टनर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.