टुडे ४ : ॲंकर
----
(शाळा व विद्यार्थ्यांचे संग्रहित स्केच वापरावे)
---
शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण मोहीम
(उपशीर्षक)
‘चला शाळेत जाऊ या’ उपक्रम; ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शाळा स्वच्छ, सुंदर आणि अध्ययन- अध्यापनासाठी पोषक बनविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘चला शाळेत जाऊ या’ विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार दोन टप्प्यांत होणाऱ्या या मोहिमेत शाळा परिसराची स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती, सुशोभीकरण आणि शैक्षणिक वातावरण अधिक आनंददायी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे.
शाळा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असल्याने तेथील वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार मिळावेत, हा या मोहिमेमागील उद्देश आहे. समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याला महत्त्व देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सुटीत लोकसहभागातून शाळांची देखभाल आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन आहे.
दोन टप्प्यांत होणार मोहीम
जिल्ह्यात ही मोहीम दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा १८ ते २४ ऑक्टोबर, तर दुसरा टप्पा २४ ते ३१ ऑक्टोबर असा आहे. या कालावधीत शाळा आणि परिसराची स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी व सुशोभीकरणाच्या कामांचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक शाळेने आवश्यक कामांची यादी तयार करून शाळानिहाय कृती आराखडा बनविणे अपेक्षित आहे.
चौकट
अधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी
शाळास्तरावर मोहिमेची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे. केंद्रप्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना मार्गदर्शन करून अंमलबजावणीचा आढावा घ्यायचा आहे. तर गटशिक्षणाधिकारी तालुकास्तरावर नियोजन करणार असून, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक हे जिल्हास्तरावर मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतील. उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांची नोंद देखील ठेवली जाणार आहे.