NSK26H33336, NSK26H33337
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंदिर विश्वस्तांची उपसमिती करणार
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह : श्री कालिका माता मंदिरात बैठक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्ह्यातील सर्वच मंदिरांच्या विश्वस्तांच्या सूचना महत्त्वाच्या असून, हा कुंभमेळा सर्वांचा आहे, त्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे. मंदिरांच्या मूलभूत सुविधांबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी स्वत: जाऊन पाहणी करणार आहे. तसेच सूचना आणि मार्गदर्शनासाठी मंदिर विश्वस्तांची उपसमिती निर्माण करणार असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. शुक्रवारी कालिका माता मंदिरात जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांची बैठक झाली. विश्वस्तांना विश्वासात घेऊन कामे करावीत, अशी एकमुखाने सर्वांनी मागणी केली.
व्यासपीठावर कालिका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुरलीधर पाटील, कुंभमेळा समिती सचिव, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, ॲड. भाऊसाहेब गंभिरे, कपालेश्वर देवस्थानचे प्रशासक विलास पाटील यांची उपस्थिती होती. या वेळी केशवराव पाटील यांनी अद्याप विश्वस्तांपैकी कुणालाही ध्वजारोहणाचे निमंत्रण मिळाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच कुंभमेळा आपला सर्वांचा आहे, येत असलेल्या अतिथींचे आम्ही स्वागत करण्यास तयार आहोत. मात्र प्रशासनाने आम्हाला विश्वासात घेतले पाहिजे. आम्ही स्वयंसेवक पुरवू परंतु काम करण्यासाठी त्यांना ओळखपत्र प्राधिकरणाने पुरवावे, अशी मागणी केली.
काळाराम मंदिराचे विश्वस्त ॲड. अक्षय कलंत्री यांनी विश्वस्तांना कुंभमेळा समितीचे सदस्य करून घेण्याची सूचना केली. छावा संघटनेचे विलास पांगारकर या वेळी म्हणाले, की प्रभू श्रीरामाच्या चौक्या ज्या ठिकाणी आहेत तेथे आयुक्तांनी स्वत: भेट द्यायला हवी. बळी महाराज मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी कुंभमेळ्यात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. कावनई येथील कल्की महाराज यांनी कपिलधारा स्थानाला भेट देण्याचे आवाहन केले. कुंभ हा कोणत्याही एका पक्षाचा नाही तर तो समस्त साधुजनांचा आहे, सर्वतीर्थ टाकेद या स्थानाला आयुक्तांनी भेट देण्याची मागणी या वेळी त्यांनी केली. कपालेश्वर मंदिर ट्रस्टचे प्रशासक विलास पाटील यांनी कपालेश्वर मंदिराचा भाग अतिशय चिंचोळा आहे, येथे काही मार्ग काढावा अन्यथा चेंगराचेंगरीसारखा प्रश्न उद्भवल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असे सांगितले. मुक्तिधामचे विश्वस्त जगदीश चव्हाण यांनी मंदिराभोवतीच्या अतिक्रमणाबाबत सांगत हा भाग मोकळा करण्याची प्रशासनाकडे मागणी केली.
बैठकीला श्री गजानन महाराज गुप्ते समाधी संस्थानचे अध्यक्ष अशोक भडकवाडे, रघुनंदन मुठे, दीपक भुतडा, राहुल देशमुख, जयगोविंद पांडेय, प्रवीण नारखेडे, हेमंत बोरा, जगदीश रामय्या आदींसह त्र्यंबकेश्वर ते नस्तनपूर तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.
स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार
कुंभमेळ्यासाठी स्वयंसेवकांना भोसला मिलिटरी कॉलेज येथे सहा दिवस प्रशिक्षण देणार असून, त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त दिवाकर रणदिवे यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. या स्वयंसेवकांना ओळखपत्र तसेच मानधन देण्याचीही व्यवस्था करणार असल्याचे शेखर सिंह यांनी सांगितले. कपालेश्वर येथील चिंचोळा भाग लक्षात असून, फेज २, फेज ३ मध्ये याचा समावेश करणार असल्याचे ते म्हणाले. उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे यांच्या अखत्यारीत शनिवार (ता. २४)पासून मंदिर विश्वस्तांना ध्वजारोहणाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. प्रत्येक देवस्थानाला १५ लाख निधी पुरवणार असल्याबाबत शेखर सिंह यांनी पुनरुक्ती केली. ग्रामीण भागातील मंदिरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे, तर शहरातील मंदिरांनी महापालिका आयुक्तांकडे अर्ज करावेत, असेही ते म्हणाले. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थानांना भेटी देणार असून, कुंभमेळा सर्वांचा आहे. सर्वांनी मिळून काम करूया, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.