110 गायींच्या मृत्यूप्रकरणी भाजप नेत्यास अटक

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

राजापूरमधील शगुन गोशाळा वर्मा यांच्या ताब्यात आहे. येथे 110 गायी ठेवण्याची सोय असली तरी सहाशेपेक्षा गायी तेथे अक्षरशः कोंबण्यात आल्या आहेत, असा दावा येथील नागरिकांनी केला आहे. गाईंना चारापाणीही वेळेत मिळत नसल्याचे सांगण्यात आले. ज्या गायी मृत्युमुखी पडल्या आहेत, त्यांना दोन दिवस चारा व पाणीही मिळाले नव्हते.

रायपूर (छत्तीसगड) : रायपूरमधील दुर्ग जिल्ह्यात सरकारी गोशाळेतील 110 गायींचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उडकीस आली आहे. या प्रकरणी गोशाळेचे संचालक व भाजपचे नेते हरीश वर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

राजापूरमधील शगुन गोशाळा वर्मा यांच्या ताब्यात आहे. येथे 110 गायी ठेवण्याची सोय असली तरी सहाशेपेक्षा गायी तेथे अक्षरशः कोंबण्यात आल्या आहेत, असा दावा येथील नागरिकांनी केला आहे. गाईंना चारापाणीही वेळेत मिळत नसल्याचे सांगण्यात आले. ज्या गायी मृत्युमुखी पडल्या आहेत, त्यांना दोन दिवस चारा व पाणीही मिळाले नव्हते. याला वर्मा हेच जबाबदार असल्याचे नागरिक व राज्यातील अधिकारी सांगत असून गंभीर निष्काळजीपणामुळे वर्मा यांना पोलिसांनी अटक केली. ते जामूल महापालिकेत भाजपचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

ही घटना दाबून टाकण्यासाठी मृत गायींना खड्ड्यात पुरण्यात आल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. या भागात मोठे खड्डे खणून एकेका खड्ड्यात 10 ते 15 मृत गायींना पुरल्याचे आढळून आल्याचे राजपूरचे सरपंच पती सेवाराम साहू यांनी सांगितले. या गोशाळेकडे दुर्लक्ष होत असून चाऱ्यासाठीच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.