"काश्‍मिरी बांधवां'चे रक्त सांडणाऱ्या भारतीयांना धडा शिकवू: अल कायदा

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

काश्‍मिरी बांधवांचे रक्त सांडणाऱ्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, अशी दर्पोक्ती अल कायदाकडून करण्यात आली आहे

नवी दिल्ली - अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेने भारतीय उपखंडाकडे अधिक सक्रिय होण्याचे संकेत देत "काश्‍मिरी बांधवां'वर अत्याचार करणाऱ्या भारतीय सुरक्षा दले व "हिंदु फुटीरतावादी' संघटनांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. अल कायदाने "उपखंडामधील मुजाहिदीन योध्यांसाठी' एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये संघटनेच्या उद्दिष्टांसहित मुजाहिदीन योध्यांनी करावयाच्या व टाळावयाच्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

"लष्करामधील सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही लक्ष्य करु. ते युद्धक्षेत्रामध्ये असोत; वा नसोत. शरियाच्या अंमलबजावणीसाठी सुरु असलेल्या या लढ्यात सुटीवर असलेल्या लष्करी जवानांनाही सोडले जाणार नाही. अधिकारी हे जवानांपेक्षा अधिक प्रखरतेने लक्ष्य केले जातील. किंबहुना जितका वरिष्ठ अधिकारी असेल; तितके त्याचे प्राण घेण्यास आमचे प्राधान्य असेल. काश्‍मिरी बांधवांचे रक्त सांडणाऱ्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,'' अशी दर्पोक्ती अल कायदाकडून करण्यात आली आहे.

अल कायदाने या निवेदनामध्ये उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यामधील एका "मौलाना असीम उमर' याची उपखंडामधील अल कायदाच्या शाखेचा "अमीर' म्हणून नियुक्ती केल्याची घोषणाही केली आहे.

काश्‍मीरमधील हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या झाकीर मुसा याने अल कायदाशी संलग्नता स्वीकाल्यानंतर भारतीय गुप्तचर खाते यासंदर्भातील सर्व घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवत आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या अन्य जागतिक दहशतवादी संघटनेपेक्षा पूर्णत: वेगळे धोरण अल कायदाकडून स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकामधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

"अल कायदाचे मुजाहिदीन हे सामान्य हिंदु, मुस्लिम वा बौद्ध नागरिकांना, तसेच त्यांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करणार नाहीत. इसिसपेक्षा हे पूर्णत: वेगळे धोरण आहे,'' असे या अधिकाऱ्याने सांगितले.

काश्‍मीरमधील सध्याच्या स्फोटक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर अल कायदाचा हा इशारा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.