उत्तर प्रदेशमध्ये बांगलादेशी दहशतवाद्यास अटक

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

गेल्या महिन्याभरापासून मुझफ्फरनगर येथे राहत असलेला अब्दुल्ला याआधी सहराणपूरमधील देवबंद भागामध्ये 2011 पासून राहत होता. अब्दुल्ला याच्याकडे बनावट आधार कार्ड व पारपत्रही आढळून आले आहे

लखनौ - उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाने आज (रविवार) अन्सारुल्लाह बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या एका बांगलादेशी दहशतवाद्यास मुझफ्फरनगर येथे अटक केली. एबीटी ही अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेली संघटना आहे.

बांगलादेशमधून भारतात घुसणाऱ्या दहशतवाद्यांसाठी बनावट ओळखपत्रे तयार करण्याची "जबाबदारी' अब्दुल्ला या दहशतवाद्यावर होती. गेल्या महिन्याभरापासून मुझफ्फरनगर येथे राहत असलेला अब्दुल्ला याआधी सहराणपूरमधील देवबंद भागामध्ये 2011 पासून राहत होता. अब्दुल्ला याच्याकडे बनावट आधार कार्ड व पारपत्रही आढळून आले आहे.

अब्दुल्ला याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून मिळविण्यात आलेल्या माहितीच्या आधारवर सुरक्षा दलांकडून सहराणपूर, मुझफ्फरनगर आणि शामली भागामध्ये मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. अब्दुल्लाला झालेली अटक सुरक्षा दलांच्या दृष्टिकोनामधून उल्लेखनीय यश मानले जात आहे.