बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

कर्करोग, हृदयरोग, हाडांचे आजार यापासून ते अनेक व्याधींवर बिअर परिणामकारक ठरते असा दावा जवाहर यांनी केला आहे.

अमरावती : बिअर ही आरोग्यासाठी उत्तम असून, हे सिद्ध करण्यासाठी मी तयार असल्याचा दावा आंध्र प्रदेशचे उत्पादनशुल्क मंत्री के. एस. जवाहर यांनी केला आहे.

आंध्र प्रदेशात नव्या मद्य धोरणावरून महिलांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जवाहर यांनी बिअर हे आरोग्यवर्धक पेय आहे हे धोरण सरकार राबवणार आहे म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. 

बिअर ही आरोग्यासाठी उत्तम नाही, हे कोण म्हणते? ती आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मी सिद्ध करून दाखवतो, असे त्यांनी वाहिनीशी बोलताना सांगितले. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी या वाहिनीला व्हॉट्सअॅपवरून मॅसेज पाठविला. त्यामध्ये बिअर आरोग्यास किती फायदेशीर याची यादीच दिली. कर्करोग, हृदयरोग, हाडांचे आजार यापासून ते अनेक व्याधींवर बिअर परिणामकारक ठरते असा दावा जवाहर यांनी केला आहे. पचनसंस्था कार्यक्षम राहते ते अगदी मधुमेहावर उपयुक्त आहे असे 13 बिअरचे फायदे त्यांनी सांगितले आहेत.