ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

2019 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार

भुवनेश्‍वर: ओडिशा राज्यामध्ये भाजप आघाडीचे राजकारण करणार नसून, 2019 ची निवडणूक एकट्यानेच लढविणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज जाहीर केले. आगामी निवडणुकीत ओडिशा विधानसभेमध्ये 120 हून अधिक जागा जिंकण्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

2019 ची निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार

भुवनेश्‍वर: ओडिशा राज्यामध्ये भाजप आघाडीचे राजकारण करणार नसून, 2019 ची निवडणूक एकट्यानेच लढविणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज जाहीर केले. आगामी निवडणुकीत ओडिशा विधानसभेमध्ये 120 हून अधिक जागा जिंकण्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

अमित शहा हे सध्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. 2019 मध्ये ओडिशामध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहा यांचा हा दौरा असल्याचे मानले जाते. शहा यांच्या 120 हून अधिक जागा जिंकण्याच्या दाव्यावर राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि बिजू जनता दलाच्या इतर नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. याबाबत बोलताना शहा यांनी पटनाईक यांच्यावर टीका केली. "भाजपचे 120 हून अधिक जागांचे लक्ष्य काही लोकांना त्यांच्या वाढत्या वयामुळे अशक्‍य वाटत आहे. भाजपने गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये गोवा, मणिपूर, आसाम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली आहे आणि 2019 मध्ये ओडिशामध्येही भाजपचीच सत्ता येईल,' असा दावा शहा यांनी केला. ओडिशा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाबाबत चर्चा असल्याबाबत शहा यांना विचारले असता त्यांनी, अद्याप कोणाचेही नाव निश्‍चित नसल्याचे सांगितले.

लिंगराज मंदिराला भेट
अमित शहा यांनी आज अकराव्या शतकातील लिंगराज मंदिराला भेट दिली. या वेळी त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. शहा यांच्या स्वागतासाठी मंदिरामध्ये पारंपरिक नृत्य आणि गायनाचे आयोजन करण्यात आले होते. लिंगराज, देवी पार्वती आणि भुवनेश्‍वरी देवी यांचे दर्शन घेतल्यानंतर शहा यांनी मंदिराच्या पुजाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.