दिल्ली विद्यापीठातील विजय हा राहुल गांधींना पाठिंबा: माकन

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

दिल्ली विद्यापीठाचा निकाल लागण्यापूर्वी राहुल गांधी यांचे बर्कले विद्यापीठात भाषण झाले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणानिमित्त संवाद साधला होता. दिल्ली विद्यापीठातील विजयामुळे युवकांनी दाखवून दिले आहे, की त्यांची राहुल गांधी यांना पसंती आहे. या पूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या निवडणूका 9 सप्टेंबरला होणार होत्या. पण, पंतप्रधान भाषण कऱणार असल्यामुळे त्या 12 सप्टेंबरला घेण्यात आल्या.

नवी दिल्ली : कॉंग्रेसप्रणीत राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी संघटनेने (एनएसयूआय) दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये मिळविलेला विजय हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बर्कले विद्यापीठात दिलेल्या भाषणाला पाठिंबा असल्याचे काँग्रेस नेते अजय माकन यांनी म्हटले आहे.

काँग्रेस "एनएसयूआय'च्या दोन विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनांचे मुख्य पदे पटकाविले. यामध्ये दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांचे अध्यक्षपदही आहे. भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) दिल्ली विद्यापीठ निवडणुकांमध्ये नेहमीच वर्चस्व राहिले आहे. या वेळी एबीव्हीपीच्या वाट्याला दोन जागा आल्या. सहसचिव व सचिव अशी दोन पदे एबीव्हीपीला मिळाली आहेत. 'एनएसयूआय'च्या रॉकी तुशीद 1590 मतांनी निवडून आला, तर कुनाल सेहरावतने एबीव्हीपीच्या उमेदवाराचा 175 मतांनी पराभव केला. मंगळवारी दिल्ली विद्यापीठामध्ये एकूण 43 टक्के मतदान झाले. मागील वर्षी "एबीव्हीपी'ने तीन जागा जिंकल्या होत्या, तर एनएसयूआयच्या वाट्याला केवळ सहसचिव पद आले होते. 

या विजयाबद्दल बोलताना माकन म्हणाले, की दिल्ली विद्यापीठाचा निकाल लागण्यापूर्वी राहुल गांधी यांचे बर्कले विद्यापीठात भाषण झाले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणानिमित्त संवाद साधला होता. दिल्ली विद्यापीठातील विजयामुळे युवकांनी दाखवून दिले आहे, की त्यांची राहुल गांधी यांना पसंती आहे. या पूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या निवडणूका 9 सप्टेंबरला होणार होत्या. पण, पंतप्रधान भाषण कऱणार असल्यामुळे त्या 12 सप्टेंबरला घेण्यात आल्या. पण, याचा काहीही परिणाम निवडणुकीवर झाला नाही. युवकांनी आमच्या नेत्याच्या बर्कले विद्यापीठातील भाषणाला पाठिंबा दिला.