भ्रष्टाचार करा; पण माफक प्रमाणात; 'यूपी'च्या उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

असाही योगायोग 
योगायोग म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवपाल यादव यांनीही सरकारी अधिकाऱ्यांना असाच सल्ला दिला होता. "कामासाठी दिलेल्या निधीतून तुम्ही (अधिकारी) चोरी करू शकता; पण त्यावर डाका घालण्याचा प्रयत्न कधीही करू नका,' असे ते म्हणाले होते.

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य वरिष्ठ नेत्यांनी कानपिचक्‍या दिल्यानंतरही भाजप नेत्यांकडून वादग्रस्त व्यक्तव्ये करण्याची मालिका बंद होण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे पंतप्रधान सांगत असतानाच त्यांच्याच पक्षातील नेते व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी माफक प्रमाणात भ्रष्टाचार होणारच, असे सांगून भ्रष्टाचाऱ्यांना जणू कुरण मोकळे करून दिले आहे. 

"कमाओ, लेकिन दालमें नमक बराबर होना चाहिए. खाओ जैसे दाल में नमक खाया जाता है|', असा सल्ला त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला. हरदोई येथे सोमवारी (ता. 11) झालेल्या कार्यक्रमात मौर्य यांनी हा अजब सल्ला देऊन पक्षाला अडचणीत आणले आहे. मौर्य यांनी खरेच असे विधान केले की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. पण अनेकांच्या मते मौर्य यांनी भ्रष्टाचाराला जणू मान्यता देऊन भाजपला तोंडघशी पाडले आहे. 

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले मौर्य राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीही आहेत. कालच्या कार्यक्रमात कंत्राटदार व अधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना "योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कंत्राटदार व अधिकारी करीत असलेल्या विकास निधीतील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. रस्त्यांसाठी पैसा येतो, पण रस्तेबांधणी कधी होत नाही, हे खपवून घेणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. पण नंतर "दालमें नमक'चे वक्तव्य केले. या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी व विद्यार्थ्यांनाही आश्‍चर्य वाटले. 

विरोधक आक्रमक 
मौर्य यांच्या या विधानाचा विरोधी पक्षांनी समाचार घेत भाजप सरकारच्या "भ्रष्टाचारमुक्त प्रशासन' या योजनेची खिल्ली उडविली. ""उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानातून सत्य बाहेर पडले आहे. दिल की बात जुबान पे आ गयी,'' असे म्हणत मौर्य यांच्या मंत्रालयाकडून खड्डे बुजविण्यासाठीच्या निधीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे उत्तर प्रदेशमधील प्रवक्ते अमरनाथ आगरवाल यांनी केला. ""यावरून विरोधक विनाकारण वाद घालीत आहेत. राज्यात भाजपने केलेली चांगली कामे लोकांसमोर आहेत. त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांमुळे त्यांना काहीही फरक पडणार नाही,'' असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते डॉ. चंद्रमोहन यांनी केले. 

असाही योगायोग 
योगायोग म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवपाल यादव यांनीही सरकारी अधिकाऱ्यांना असाच सल्ला दिला होता. "कामासाठी दिलेल्या निधीतून तुम्ही (अधिकारी) चोरी करू शकता; पण त्यावर डाका घालण्याचा प्रयत्न कधीही करू नका,' असे ते म्हणाले होते.