'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

राहुल गांधी यांनी या वेळी 'जीएसटी'सह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 'जीएसटी'तून सरकार अधिक कर गोळा करत आहे.

नवी दिल्ली - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मायदेशी परतताच केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी सडकून टीका केली. जीएसटी (वस्तू व सेवाकर) म्हणजे "गई सेव्हिंग तुम्हारी' अर्थात बचतीवर पाणी, असे सांगत मोदी सरकारला टोला लगावला. 

राहुल गांधी यांनी या वेळी "जीएसटी'सह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. "जीएसटी'तून सरकार अधिक कर गोळा करत आहे. एलपीजीचा "जीएसटी'त समावेश करून नफा कमावण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ता अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन जीएसटीसह अनेक मुद्द्यांवर भाजप सरकारवर टीका केली. "जीएसटी'ची अंमलबजावणी करून हे सरकार अधिक कर मिळवत आहे. या वेळी त्यांनी विदेशी दौऱ्यावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्या विदेशी दौऱ्यांनी काही साध्य होत नाही. हा त्यांचा 65 वा विदेश दौरा आहे. पंतप्रधान मोदी अनेक देशांचे दौरे करत आहेत. पण त्यातून काहीच हाती लागत नाही. याउलट शेजारी देशांशी संबंध बिघडू लागले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.