जमावाच्या हल्ल्यांनी राष्ट्रपती चिंतित

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

देशात वाढत जाणारी असहिष्णुता आणि भपकेबाजीविरोधात आपण एक व्हायला हवे, ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नाही अशी मंडळी महापुरुषांचा वारसा मिटविण्याचे काम करत आहेत. तसेच, जी मंडळी त्यांच्या विचारांशी सहमत नाहीत, त्यांना अन्य मार्गाने गप्प केले जात आहे.
- सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा

नवी दिल्ली - माथेफिरू जमावाकडून एका विशिष्ट समुदायावर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. आम्ही आपल्या मूलभूत मूल्यांप्रती जागरूक आहोत का, असा सवाल करत त्यांनी या घटनांबाबत आम्ही जागरूकता बाळगली नाही, तर पुढची पिढी आमच्याकडे आम्ही काय केले याचा हिशेब मागेल, असे त्यांनी नमूद केले. 

‘नॅशनल हेरल्ड’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याही उपस्थित होत्या.लोकशाही व्यवस्थेत जागरूकता अत्यंत महत्त्वाची असते, त्यामुळे माध्यमे आणि संपादकांची जबाबदारी अधिक वाढते. तुम्ही लोकशाहीचा पाया आहात. माध्यमे आणि सामान्य नागरिक सावध राहिले, तर ते अशा प्रकारच्या प्रवृत्तींविरोधात मोठी प्रतिरोधक शक्ती ठरू शकतात. उपासमार, गरिबी आणि सामाजिक विषमतेबाबत आम्हाला अधिक जागरूक राहायला हवे, असेही त्यांनी नमूद केले. 

आमची राज्यघटना केवळ शासकीय ग्रंथ नसून ती सामाजिक, आर्थिक समरसता सुनिश्‍चित करणारी मॅग्नाकार्टा आहे, असे सांगत प्रणव मुखर्जी यांनी स्वातंत्र्यचळवळीत ‘नॅशनल हेरल्ड’चे सर्वांत मोठे योगदान असल्याचे नमूद केले.