आर्थिक व्यवहारांवरून वेंकय्या नायडू लक्ष्य

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 जुलै 2017

पारदर्शकतेची आणि इमानदारीचे दाखले देणारे वेंकय्या नायडू हे ज्येष्ठ नेते आणि शब्दकवी आहेत. पुत्र, कन्या, भाजप आणि स्वतःशी संबंधित त्यांच्या व्यवहारांबद्दल देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे.
- जयराम रमेश, कॉंग्रेसचे नेते

पुत्र, कन्येला फायद्याबाबत खुलाशाची कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार वेंकय्या नायडू यांना आर्थिक व्यवहारांवरून कॉंग्रेसने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. नायडू यांचे पुत्र आणि कन्येला झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फायद्याबद्दल पारदर्शकपणे खुलासा केला जावा, असे आव्हान कॉंग्रेसने दिले आहे.

कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन नायडू यांना लक्ष्य केले. राजकीय नेतृत्वाने पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची सातत्याने वकिली करणाऱ्या नायडूंनी कॉंग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी जयराम यांनी केली. ते म्हणाले, की वेंकय्या नायडू यांची कन्या व्यवस्थापकीय विश्वस्त असलेल्या "स्वर्णभारत ट्रस्ट'ला तेलंगण सरकारने 20 जून 2017 ला दोन कोटी रुपयांची सूट दिली. तसेच जुलै 2014 मध्ये तेलंगण सरकारने विनानिविदा 270 कोटी रुपयांची वाहन खरेदी केली होती. ही वाहन खरेदी ज्या दोन डिलरकडून झाली, त्यातील एक तेलंगणचे मुख्यमंत्री यांचे पुत्र तर दुसरे डिलर वेंकय्या नायडू यांचे पुत्र होते.

याव्यतिरिक्त, सहा एप्रिल 2011 ला सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढून, मध्य प्रदेश सरकारने कुशाभाऊ ठाकरे मेमोरियल ट्रस्टला दिलेला 20 एकरचा 600 कोटी रुपयांचा भूखंड देण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला. खुद्द वेंकय्या नायडू हे या ट्रस्टचे अध्यक्ष होते आणि या व्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. एवढेच नव्हे तर, नेल्लोर येथे भूमीहिनांसाठी राखीव असलेला भूखंड वेंकय्या नायडू यांच्या नावावर होता. हा भूखंड सात ऑगस्ट 2002 ला वेंकय्या नायडू यांनी जिल्हा प्रशासनाला परत केला. ही सर्व माहिती खरी आहे काय, असा प्रश्‍न रमेश यांनी केला.