काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

या घटनेमुळे राज्य आणखी रसातळाला गेले आहे, हे "भाजप-पीडीपी' आघाडीचे अपशय असून राज्याची होत असलेली ही पीछेहाट खेदजनक आहे. 
राहुल गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष 

श्रीनगर - काश्‍मीर खोरे हिंसाचाराच्या वणव्यामध्ये होरपळत असताना श्रीनगरमध्ये नौहट्टा परिसरातील जामिया मशिदीबाहेर माथेफिरू समुदायाने गुरुवारी रात्री एका पोलिस उपअधिक्षकाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

महंमद आयूब पंडित असे या अधिकाऱ्याचे नाव असून, शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. पंडित हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला, त्यांच्या हत्येचा सर्वस्तरातून निषेध होतो आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जनतेने पोलिसांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा दिला असून हुर्रियत नेते मिरवाईज उमर फारूख यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून, तिसऱ्या संशयिताचीही ओळख पटली आहे. महंमद पंडित यांना येथील मशिदीबाहेर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास प्रार्थनेनंतर मशिदीतून बाहेर येणाऱ्या लोकांची पंडित छायाचित्रे टिपत होते. या वेळी माथेफिरू टोळक्‍याने पंडित यांना खेचण्याचा प्रयत्न केला असता त्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. यामध्ये तिघेजण जखमी झाले. यानंतर अधिकच खवळलेल्या जमावाने त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत त्यांचा दगडाने ठेचून खून केला. हिंसक जमावाने सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनचीही मोडतोड करायला सुरवात केल्याने सुरक्षा दलांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 
ंमहंमद पंडित यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 च्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. येथे रोज प्रार्थनेला येणाऱ्या लोकांशी पंडित यांचा चांगलाच परिचय होता. काश्‍मीरमध्ये प्रार्थनास्थळी तैनात करण्यात आलेले पोलिस अधिकारी गणवेश परिधान करत नाहीत. जमावाने हल्ला केला तेव्हाही पंडित यांनी गणवेश घातला नव्हता. या घटनेनंतर जुन्या श्रीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

पंडित यांचा खून कल्पनेपलीकडील शोकांतिका असून, तो क्रोर्याचा कळस आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई व्हायला हवी. 
उमर अब्दुल्ला, कार्यकारी अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स 

या घटनेमुळे राज्य आणखी रसातळाला गेले आहे, हे "भाजप-पीडीपी' आघाडीचे अपशय असून राज्याची होत असलेली ही पीछेहाट खेदजनक आहे. 
राहुल गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष 

माथेफिरू जमावाचे कृत्य हे लाजिरवाणे असून लोकांनी पोलिसांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. जम्मू- काश्‍मीर पोलिस ही देशातील सर्वोत्तम पोलिस असून राज्यातील कायदा सुव्यवस्था त्यांनी मोठ्या संयमाने सांभाळली आहे. आपण आपल्याच लोकांना सांभाळत आहोत, या भावनेने ते काम करत आहेत; पण हा संयम किती काळ कायम राहील? पोलिसांचा संयम सुटला तर परिस्थिती आणखी बिकट होईल. 
मेहबूबा मुफ्ती, मुख्यमंत्री, जम्मू-काश्‍मीर