गायक अभिजितचे ट्विटर अकाऊंट पुन्हा 'सस्पेंड'

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

अनुपम खेर यांनी ट्विट करत सांगितले, की पुन्हा एकदा गायक अभिजित यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटर इंडियाला काय अडचण आहे. ट्विटर सर्व राष्ट्रवादींचे अकाउंट बंद का करत आहे?

मुंबई - आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे गायक अभिजित भट्टाचार्य यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच ट्विटरने अभिजित यांचे व्हेरिफाईट अकाउंट बंद केले होते.

अभिजित भट्टाचार्य यांनी जेएनयूमधील विद्यार्थी शेहला रशीद हिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले होते. सोमवारी आपले नवे अकाउंट सुरु करताना (@singerabhijeet) अभिजित यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत म्हटले होते, की काही जण माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. देश आणि लष्कराविरोधात बोलणाऱ्यांच्या मी विरोधात आहे. हे माझे नवे ट्विटर अकाउंट आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी वंदे मातरम, मी परत आलो आहे. माझे व्हेरिफाईट अकाउंट सुरु होईपर्यंत मला या अकाउंटवर फॉलो करा, असे ट्विटही केले होते.

मात्र, काही वेळातच ट्विटरकडून त्यांचे हे अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे. यानंतर अनुपम खेर यांनी ट्विट करत सांगितले, की पुन्हा एकदा गायक अभिजित यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटर इंडियाला काय अडचण आहे. ट्विटर सर्व राष्ट्रवादींचे अकाउंट बंद का करत आहे?