मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ते, पण ऐकत नाहीत: राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

2012 मध्ये आमच्या पक्षात गर्व निर्माण झाला होता. आम्ही लोकांशी संवाद साधणे सोडून दिले होते. आता पक्षाची पुर्नबांधणी करण्याची गरज आहे. पक्षाने जबाबदारी सोपवली तर मी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास तयार आहे.​

कॅलिफोर्निया : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझेही पंतप्रधान आहेत. मोदींमध्ये काही गुण असून, ते माझ्यापेक्षा कितीतरी चांगले वक्ते आहेत. त्यांनी सुरु केलेले स्वच्छ भारत अभियान हे चांगले आहे. मोदी माझ्याशी योग्य पद्धतीने संवाद साधतात. आपले मत लोकांपर्यंत पोचविण्यात ते पटाईत आहेत. मात्र, ते भाजपमधील एकाही नेत्याचे ऐकून घेत नाहीत, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

आपल्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी राजकीय नेते, थिंकटॅंक, तसेच भारतीय वंशाच्या नागरिकांना भेटणार आहेत. कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठात त्यांचे '70 वर्षांनंतरचा भारत' या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. 1949 मध्ये या विद्यापीठात तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे भाषण झाले होते. या व्यतिरिक्त लॉस अँजेलिस येथे राहुल गांधी अमेरिकेतील थिंक टॅंकसमवेत चर्चा करणार आहेत. सिस्टीममधून निवडून न येता राजकारणात येण्याची कोणाची इच्छा असेल, तर त्यांनी शशी थरूर, सॅम पित्रोदा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

राहुल गांधी म्हणाले, ''आज देशात सांप्रदायिक शक्ती मजबूत होत आहेत, हिंसा आणि द्वेषाचे राजकारण सुरु आहे. ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंसेमुळेच मी माझी आजी आणि वडिलांना गमावले आहे. हिंसा ही माझ्यापेक्षा अधिक चांगली कोणी जाणू शकत नाही. अहिंसेमुळे लोक एकत्र येण्यास मदत होते. कोणत्याही व्यक्तीविरोधातील हिंसा चुकीची आहे. बीफच्या नावावरून देशातील मुस्लिम नागरिकांना त्रास दिला जात आहे. पक्षात कौंटुंबिकवाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव, अभिषेक बच्चन ही कौटुंबिकवादाची उदाहरणे आहेत. संसदेला अंधारात ठेवून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. संसदेचे याबाबत काय मत आहे, हे जाणून घेतले नाही. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. मोदी सरकारने माहिती अधिकाराचा (आरटीआय) कायदा बंद करून टाकला. आमच्या सरकारच्या काळात प्रत्येकजण माहिती मिळवू शकत होता. पण, आता तसे राहिले नाही. 2012 मध्ये आमच्या पक्षात गर्व निर्माण झाला होता. आम्ही लोकांशी संवाद साधणे सोडून दिले होते. आता पक्षाची पुर्नबांधणी करण्याची गरज आहे. पक्षाने जबाबदारी सोपवली तर मी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास तयार आहे.''

राहुल गांधी म्हणाले, की माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी 2013 मध्ये काश्मीरमधील हिंसाचार जवळपास संपुष्टात आणला होता. त्यामुळे त्यांचे कौतुकही करण्यात आले होते. पीडीपी युवकांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, त्यांनी भाजपबरोबर युती केल्यानंतर त्यांनी हे काम बंद केले. पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी रस्ता मोकळा करून दिला आहे. अन् दिवसेंदिवस तेथील हिंसाचार वाढतच चालला आहे. रशियाकडून पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करण्यात येत आहे.