'मोरा' चक्रीवादळाची बांगलादेशला धडक

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

मोरा हे चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकले. बांगलादेशमधील चिटगाव येथे जोरदार पाऊस होत असून, किनारपट्टीवर गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

ढाका - 'मोरा' चक्रीवादळाने आज (मंगळवार) बांगलादेशच्या किनाऱ्याला धडक दिली असून, तीन लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. 

मोरा हे चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकले. बांगलादेशमधील चिटगाव येथे जोरदार पाऊस होत असून, किनारपट्टीवर गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. या वादळामुळे प्रतितास 117 किमी वेगाने वारे वाहत आहेत. नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ओडिशाच्या किनाऱ्यावर या वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. हे वादळ उपसागराच्या ईशान्य दिशेने बांगलादेशकडे वेगाने सरकत होते. अखेर आज ते बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ तयार झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वादळाचा परिणाम म्हणून ईशान्य भारतातही जोरदार पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे भारतातील मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.