उद्धट भारताला नियम शिकवायला हवेत: चीनचा फुत्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

सीमावादामध्ये चीनच्या विरोधात उभे राहणे भारताला परवडणारे नाही. सीमावादाचा भडका उडू देणे चीनने आत्तापर्यंत टाळले आहे. यावेळी मात्र भारताला नियम शिकविणे आवश्‍यक आहे

नवी दिल्ली - सीमेमध्ये घुसखोरी केल्यासंदर्भात भारत व चीनमधील उफाळून आलेला वाद आज (बुधवार) अधिक स्फोटक बनला. "उद्धट भारताला नियम शिकविण्याची गरज,' असल्याचे मत ग्लोबल टाईम्स या चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधील एका लेखामध्ये व्यक्त करण्यात आले. 

याचबरोबर "अमेरिका व पाश्‍चिमात्य देश चीनविरोधात भारताची मनधरणी करत असल्याने भारतीयांना आपण व्यूहात्मकदृष्टया वरचढ असल्याचे वाटू लागल्याची,' टीकाही या लेखामध्ये करण्यात आली आहे.

"भारताचे सकल आर्थिक उत्पन्न (जीडीपी) हे आता जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असल्याने भारताचा राष्ट्रीय आत्मविश्‍वास प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मात्र राष्ट्रीय सामर्थ्याच्या दृष्टिकोनामधून भारत अजूनही चीनच्या पुष्कळ मागे असल्याचे भारताने ध्यानात ठेवावे. सीमावादामध्ये चीनच्या विरोधात उभे राहणे भारताला परवडणारे नाही. सीमावादाचा भडका उडू देणे चीनने आत्तापर्यंत टाळले आहे. यावेळी मात्र भारताला नियम शिकविणे आवश्‍यक आहे,'' असा इशारा या लेखाच्या माध्यमाधून देण्यात आला आहे.

याआधी, भारतीय - चीन सीमारेषेवरील सिक्कीम भागामध्ये चीनच्या सार्वभौम हद्दीमधील रस्त्याचे बांधकाम करण्यापासून भारतीय लष्कराकडूनच रोखण्यात आल्याचा कांगावा चीनकडून करण्यात आला होता.