रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा झाला ‘आयएएस’

रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा झाला ‘आयएएस’

पुणे - माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेली मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्ती (ताडीवाला रस्ता)... अवैध धंद्यांपासून ते गुन्हेगारी प्रकाराच्या अनेक गोष्टी इथे घडतात... मात्र याच वस्तीत रेल्वेच्या ‘डिझेल कॉलनी’त राहणारा एक मुलगा प्रतिकूलतेवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण होतो. ऐवढेच नाहीतर तो देशात १६० व राज्यात सातवा क्रमांक मिळवीत यशाच्या सर्वोच्च स्थानी पोचतो... रेल्वे कर्मचाऱ्याचा हा मुलगा आहे, दिनेश रमेश गुरव!   

घोरपडी येथील रेल्वेच्या डिझेल लोकोशेडमध्ये ३५ वर्षांपासून काम करणारे रमेश गुरव. दिनेशच्या जन्मापासूनच ते रमाबाई आंबेडकर वस्तीमध्ये डिझेल कॉलनीत वास्तव्य करत आहेत. तेथील दोन छोट्या खोल्यांमध्ये चार-पाच जणांचे गुरव कुटुंब अनेक वर्षांपासून राहात आहे. अवतीभोवतीचे वातावरण शिक्षणासाठी पूरक नाही, परंतु अशाही परिस्थितीत ‘वस्तीमधील मित्र कसेही असू दे, त्यांना आपल्यासारखेच हुशार बनवायचे,’ असे संस्कार दिनेशवर घरात होत गेले.

घरात मी एकटाच कमावणारा आहे, याची दिनेशला जाणीव होती. त्यामुळे त्याने मोबाईल, गाडी किंवा मौजमजेसाठी कधीच अट्टहास केला नाही, याउलट त्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीतूनच त्याने लॅपटॉप व गाडी घेतल्याचे रमेश गुरव सांगतात. त्याला मिळालेले पुरस्कारांनी भरलेले कपाट दाखविताना ते भरभरून कौतुकही करतात. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये असताना दिनेशने दहावी, बारावीमध्ये कायम ‘टॉपर’ राहिला. फर्ग्युसन महाविद्यालयानंतर पुण्याच्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (सीओईपी) ‘बीटेक’साठी प्रवेश मिळाला. ‘सीओईपी’ने ‘उन्नत भारत अभियान’अंतर्गत जुन्नरमध्ये घेतलेले शिबिर आणि ‘चाणक्‍य’ची मेळघाट येथील भेट, या दोन ठिकाणचे वास्तव पाहिल्यानंतर दिनेशने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देऊन ‘आयएएस’ होण्याचे ठरविले. त्यानुसार अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नातच त्याने यश मिळविले. 

दररोज सकाळी सहा वाजता उठून योगा, धावणे, ध्यानधारणा करण्यास दिनेश प्राधान्य देतो. त्यामुळे ताण-तणावावर नियंत्रण मिळविणे त्याला शक्‍य झाले. ‘सीओईपी’ची अभ्यासिकेबरोबरच ‘यूपीएससी’चे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांकडून मार्गदर्शन घेतानाच त्याने ‘सेल्फ स्टडी’ला अधिक महत्त्व दिले. दिनेश सांगतो, ‘‘वस्तीमधील मित्रांनाही चांगले शिक्षण कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केला. ‘आयएएस’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन या परीक्षेविषयी जागृती करत आहे. आयुष्यात कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही, त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com