डीकॅड महाविद्यालयाकडून ‘महावितरण’ला वीज

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

विजेची बचत ही काळाची गरज आहे हे ओळखून देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन म्हणजेच डीकॅड कला महाविद्यालयाने सौरशक्ती वापरण्याचे निश्‍चित केले व सौरऊर्जा निर्मिती करून महाविद्यालयाला आवश्‍यक तेवढी वीज मिळविली. शिवाय, शिल्लक वीज ‘महावितरण’ला देण्यात येते.

साडवली - विजेची बचत ही काळाची गरज आहे हे ओळखून देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन म्हणजेच डीकॅड कला महाविद्यालयाने सौरशक्ती वापरण्याचे निश्‍चित केले व सौरऊर्जा निर्मिती करून महाविद्यालयाला आवश्‍यक तेवढी वीज मिळविली. शिवाय, शिल्लक वीज ‘महावितरण’ला देण्यात येते. अशा तऱ्हेचा हा जिल्ह्यातील बहुधा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.

डीकॅड कला महाविद्यालयात प्रशिक्षणाचे स्टुडिओ आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. आर्थिक बोजाही वाढता आहे. तो टाळण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा पर्याय पुढे आला. त्यासाठी आवश्‍यक ती सामग्रीही बसवण्यात आली. डीकॅड येथे सौरऊर्जा पॅनल बसवण्यासाठी इमारतीवर तयारी करण्यात आली. या ठिकाणी टाटा पॉवर ग्रीट टाय पॉवर सिस्टिम डायनॅमो जी १००० ही बसवण्यात आली. १०किलो वॅटची दोन पॅनल म्हणजे एकूण ८० प्लेटस बसवण्यात आल्या. गेल्या सहा महिन्यापासून डीकॅड येथे सौरऊर्जेचा वापर होऊ लागला आहे.

या सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलात कमालीचा फरक पडला असून फक्त पावसाळ्यातच महावितरणची वीज वापरावी लागली. ज्यावेळी सौरऊर्जेद्वारे वीज तयार होत नाही त्याच काळात पूर्णपणे महावितरणची वीज वापरावी लागते. मात्र वर्षाचा विचार करता असे दिवस फारच कमी आहेत. सौरची वीज महावितरणला दिलेली असल्याने गरज असेल तेव्हा ती परतही घेतली जाते.

या प्रकल्यासाठी केलेली गुंतवणूक थोड्याच कालावधीत वसूल होते हेही लक्षात आले. कोकणात पाऊस जास्त असल्याने सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात करता येणार नाही, असा समज या प्रयोगामुळे खोटा ठरला आहे. सौरऊर्जेबाबत रस असणाऱ्यांनी डीकॅडला भेट देऊन या प्रयोगाची माहिती घेतल्यास अनेक संस्थासंघटनाना त्याचा फायदा होईल इतका हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

६५ टक्के वीज विकता येते
या ठिकाणी दहा किलो वॅटची दोन युनिट कार्यरत असून एका युनिटपासून दिवसाला ५०, म्हणजे दोन्ही मिळून १०० युनिट वीज तयार होते, अशी माहिती बाळासाहेब पित्रे यांनी दिली. या १०० युनिट पैकी फक्त ३५ टक्के वीज डीकॅड वापरते. उर्वरित ६५ टक्के वीज महावितरणला देण्यात येते. सौरऊर्जा निर्मितीचा व त्याद्वारे वीज बचतीचा हा प्रयोग यशस्वी ठरला.

भविष्य काळासाठी वीज आणि इंधन बचत करणे आवश्‍यक आहे. यासाठी ठिकठिकाणी सौरऊर्जा निर्मिती करणे गरजेचे आहे. कोकणात तो यशस्वी होऊ शकतो, हे डीकॅडच्या प्रयोगाने सिद्ध झाले.
- बाळासाहेब पित्रे

Web Title: Ratnagiri news solar light in Dcad college