कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

विशाल पाटील
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

उपचारासाठी ‘सकाळ’चा पुढाकार; फुप्फुस, हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण
सातारा - हसती, बोलती कोमल हिला अचानक दुर्धर आजाराने गाठलं. हृदय, फुफ्फुस खराब असल्याचे निदान झाले. उपचारासाठी हवे होते तब्बल ४२ लाख... दै. ‘सकाळ’ने एक पाऊल टाकत मदतीचे आवाहन केले... समाजातील दानशूर ‘हृदय’ पुढे केले... आज ती बरी झाली अन्‌ तिने सहृदयी दानशूरांबरोबर ‘सकाळ’चेही आभार मानले.

येथील उत्तेकरनगरमधील कोमल व पती धीरज गोडसे हे दोघे यशोदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेथे इंजिनिअरिंगचे धडे देणारी २६ वर्षीय कोमल ही नोकरीबरोबर पुण्यात ‘एमई’ची शिक्षण घेत होती. सप्टेंबर २०१६ मध्ये ती सातत्याने आजारी पडू लागली. तेथून पुढे तिचा मृत्यूशी झुंज देणारा प्रवास सुरू झाला. हायपर टेन्शन कमी होत नसल्याने पुण्यात रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. त्यावेळी तिचे फुफ्फुस आणि हृदय खराब झाल्याचे निदान झाले. त्यानंतर बाँबे हॉस्पिटलसह अमेरिकेतही तिने उपचार घेतले. चेन्नईतील ग्लिनेगल्स ग्लोबल हेल्थ सिटी रुग्णालयात तिला फुफ्फुस, हृदयाचे प्रत्यारोपणासाठी दाखल करण्यात आले. तेथील उपचारासाठी तब्बल ३० लाखांवर खर्च होणार होता. त्यापूर्वीच १२ लाखांवर खर्च झाल्याने कुटुंबांची आर्थिक स्थितीही ढासळली होती. 

समाजातील दातृत्वांनी मदतीचे हात पुढे केले, तर तिच्यावर उपचार होतील आणि कोमलला नवे जीवन मिळेल, ही अपेक्षाही गोडसे कुटुंबीयांना आहे. त्याची दखल घेत दै. ‘सकाळ’ने ‘हसऱ्या कोमलसाठी हवेत दानशूर हात’ अशी हाक समाजाला दिली. महाविद्यालयीन ग्रुप, समाजातील दानशूर व्यक्‍ती तसेच सोशल साइटवरील ‘मिलाफ’ संस्थेने साडेतीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख यासह विविध माध्यमातून १५ लाख रुपयांची मदत उभी राहिली. या मदतीतून तिच्यावर उपचार झाले. उपचारानंतर आता तिची तब्बेत सुधारत आहे. नुकतेच साताऱ्यात दाखल होऊन तिने गणेशोत्सवही साजरा केला.