कोमेजल्या जिवांना 'रयत'ची संजीवनी

दिलीपकुमार चिंचकर
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना हक्काचा आधार

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना हक्काचा आधार
सातारा - पावसाने लागोपाठ दगा दिला. पेरलेल्या पिकाला कोंबच फुटले नाहीत. घर, शेतावर काढलेलं कर्ज वाढत गेलं. बा सारखा इचारात असायचा... एक दिवस बानं रात्री झोपायच्या आधी माज्या अन्‌ तायडीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. "बा'नं आईकडं बघितलं अन्‌ तोंड फिरवून त्यो झोपाय गेला. सकाळी जाग आली, ती आयेच्या हंबरड्यानं. माझा बाप घरातल्या तुळवीला लटकला हुता...

येथील धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगमध्ये "तो' आपली नजर शून्यात लावून बोलत होता. मराठवाड्यातील गोरख, विदर्भातील तुळसा अशा शेकडो मुलामुलींच्या, हृदयाला पीळ पाडणाऱ्या खऱ्याखुऱ्या कथा अनुभवायच्या असतील, तर साताऱ्यातील धनणीच्या बागेतील शाहू बोर्डिंगला अवश्‍य भेट द्या. तळागाळातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देऊन शिक्षित करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या बोर्डिंगमध्ये आता कर्जामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना रयत शिक्षण संस्थेने आसरा दिला आहे. शासनाच्या एका "पै'चीही अपेक्षा न करता या वाऱ्यावर असलेल्या मुलांच्या जीवनाची जबाबदारी आता संस्थेने उचलली आहे. गरिबीने, कर्जाच्या बोज्यामुळे फासाला लटकलेल्या, विष प्यायलेल्या शेतकऱ्यांच्या या मुलांच्या जीवनात आता आनंद भरला असून, ते केवळ"रयत'मुळे पारंब्यासमवेत हिंदोळा घेत आहेत.

गरिबांच्या मुलांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील धनणीच्या बागेत संस्थेचे पहिले वसतिगृह सुरू केले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागांतील गरीब, अनाथ, एक पालकत्व असलेली मुले शिक्षण घेत असत. त्यासाठी शासनाकडून अल्पसा निधी मिळत होता. मात्र, गेल्या वर्षी शासनाच्या एका अध्यादेशाच्या फटकाऱ्याने वसतिगृह बंद करावे लागले. गरिबांच्या सर्व मुलांना शिक्षण सोडून घरी पाठवावे लागले. मात्र, कर्मवीरांचे हे ऐतिहासिक वसतिगृह स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा निर्णय रयत शिक्षण संस्थेने घेतला.

विदर्भ- मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची शेकडो मुले निराधार झाली आहेत. तेथील मुलांना या वसतिगृहात आणून त्यांच्या शिक्षणाची आणि जगण्याची सर्व जबाबदारी घ्यायचे "रयत'ने ठरविले. निराधार झालेल्या त्या मुलांचा शोध संस्थेने घेतला. त्यांना तेथून आणले. सध्या या वसतिगृहात राहून 20 मुली आणि 21 मुले शिक्षण घेत आहेत. कित्येक वर्षे "भूक'ही पचवलेल्या या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी संस्थेने घेतली असून, ती आता भरल्या पोटी शिक्षण घेऊ लागली आहेत.

'शाहू बोर्डिंग हे कर्मवीरांचे पहिले वसतिगृह. ते बंद पडणे कोणालाही रुचणारे नव्हते. म्हणून आम्ही ते स्वखर्चाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता विदर्भ- मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना वसतिगृहात प्रवेश दिला आहे. त्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. समाज आम्हाला त्यासाठी निश्‍चित मदत करेल.''
- डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था