राणेंची कॉंग्रेसमधून आवराआवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य

प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य
कणकवली / सावंतवाडी - कॉंग्रेसनेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेश चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचालींना आज अचानक वेग आला. त्यांनी कॉंग्रेसमधील आपली आवराआवर सुरू केली असून, विश्‍वासू वरिष्ठ पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांची त्यांनी आज अचानक तातडीची बैठक घेतली. ते उद्या (ता. 18) दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे समजते.

कॉंग्रेसमध्ये गेले वर्षभर नाराज असलेले नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. राणेंनी याचा स्पष्ट शब्दांत कधीच इन्कार केला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांच्यातील अंतर्गत संघर्ष गेला काही काळ सुरू आहे. मात्र चव्हाण यांनी अलीकडे राणेंच्या विरोधात जाहीर वक्तव्य केले नव्हते. चार दिवसांपूर्वी मात्र त्यांनी "ज्यांना पक्ष सोडून जायचेय त्यांनी खुशाल जावे,' असे सूचित वक्तव्य केले होते. याला राणेंच्या गोटातूनही उत्तर देण्यात आले. राणे गेला महिनाभर अधूनमधून जिल्हा दौऱ्यावर येत होते.

आमदार नीतेश राणे यांचाही जिल्ह्यात दीर्घकाळ मुक्काम होता. आठ-दहा दिवसांपूर्वी राणे यांनी कुलदैवत असलेल्या कांदळगाव येथे श्री देव रामेश्‍वराचे दर्शनही घेतले. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता एखादा मोठा निर्णय घेण्याआधी ते कांदळगावमध्ये कुलदैवताच्या दर्शनाला आवर्जून जातात. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार निश्‍चित झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपमधील हालचाली पाहता राणे यांचा प्रवेश निश्‍चित मानला जातो. मधल्या कालावधीतील केंद्रातील आणि राज्यातील महत्त्वाच्या निवडी असल्याने राणेंचा हा कथित प्रवेश बराच काळ पुढे लांबला; मात्र राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील दोन महिन्यांत होऊ घातल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपने "एकला चलो रे' अशी भूमिका घेत बड्या नेत्यांचे "इनकमिंग' सुरू केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील बडे नेते आणि कार्यकर्ते भाजपकडे ओढले जात आहेत.

राणेंनी आज अचानक घेतलेल्या बैठकीनंतर सायंकाळी सिंधुदुर्गातील राजकीय हालचालींना वेग आला. राणे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचेही समजते. आजच्या बैठकीला राणेंचे प्रमुख समर्थक पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्षांना बोलाविण्यात आले होते. पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही बैठक झाली. या गुप्त बैठकीत कथित भाजप प्रवेशाविषयी त्यांनी पहिल्यांदाच उघडपणे भूमिका मांडल्याचे समजते.

वैद्यकीय महाविद्यालय टर्निंग पॉइंट?
नारायण राणे यांच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय पडवे येथे सुरू होत आहे. राणेंसाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ऑगस्टमध्येच याचे उद्‌घाटन होईल, असे जाहीर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपमधील बडा नेता हजेरी लावणार अशी चर्चा होती. या महाविद्यालयाचे उद्‌घाटन हा सिंधुदुर्गाची नवी राजकीय समीकरणे मांडणारा सोहळा ठरेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.