‘उंची’ गाठण्यासाठी मनोज करतो ८० कि.मी. प्रवास

नरेश शेळके
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मला पैसा नको, माझी पुण्यात कुणी राहायची आणि शिक्षणाची सोय करून दिली, तर आणखी जोमाने मला सराव करता येईल. हवी तेवढी मेहनत करण्याची माझी तयारी आहे. हवीय फक्त साथ.
- मनोज रावत

नागपूर - शांत स्वभावाच्या मनोज नाथोसिंग रावतला उंच उडीत उंची गाठायची आहे. मात्र, सरावासाठी पुण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव येथे उंच उडीसाठी आवश्‍यक असलेल्या पुरेशा सुविधा नाहीत. त्या सुविधा मिळविण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शकाखाली उत्तम सराव करण्यासाठी तो रोज एकूण ८० किलोमीटर प्रवास करतो. या श्रमाचे त्याला फळही मिळू लागले आहे. 

नुकत्याच नागपुरात झालेल्या २९ व्या पश्‍चिम विभागीय ज्युनिअर ॲथलेटिक्‍स स्पर्धेत मनोजने १६ वर्षे वयोगटात उंच उडीत १.८४ मीटर उंची मारताना सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी डेरवण येथे झालेल्या राज्य स्पर्धेत त्याने १.८२ मीटर अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळविला होता. ५ फूट ११ इंच उंची लाभलेल्या मनोजला प्रथम १ मीटर ९० सेंटिमीटर अंतर पार करायचे आहे आणि येत्या एक-दोन वर्षात भारतासाठी पदक जिंकायचे आहे. त्याचा परिवार मूळच उत्तराखंडचा. पुण्यात आल्यावर त्याचे वडील एका कंपनीत रुजू झाले. घरी खेळाला असे पोषक वातावरण असल्याने मनोजला पुण्यात सराव सुरू करण्यास अडचण गेली नाही. त्याचा लहान भाऊ उत्तम व्हॉलिबॉलपटू आहे. 

तळेगावातील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम शाळेतील सरांनी उंची पाहून उंच उडी करायला लावली आणि तेथून मनोजचा उंच उडीचा प्रवास सुरू झाला. मनोज म्हणाला, ‘‘ ‘सुरवातीला ‘सिझर’ या पारंपारिक पद्धतीने उडी मारायचो, त्यामुळे १.६५ मीटरच्या पुढे जाऊ शकलो नव्हतो. गेल्यावर्षी ‘सकाळ’च्या स्कूलिंपिकमध्येही भाग घेतला होता. त्याचवेळी डेक्कन जिमखानाचे अभय मळेकर यांच्याविषयी माहिती झाली. मात्र, दहावीच्या परीक्षेमुळे सरावात काही काळ खंड पडला. एप्रिल महिन्यापासून पुण्यात सरावाला सुरवात केली. रोज ८० किलोमीटरचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, आई-वडिलांनी परवानगी दिली, त्यामुळेच आज झपाट्याने प्रगती करू शकलो.’’ 

या पाच महिन्यांत त्याने आपल्या कामगिरीत २० सेंटिमीटरने सुधारणा केली आहे. मनोजचा दिवस पहाटे साडेचारला सुरू होतो. पूजा, योगा केल्यानंतर तो सायकलने तीन किलोमीटर अंतर पार करून तळेगाव स्टेशनवर येतो. तिथून ट्रेनने शिवाजीनगर व नंतर बसने कधी डेक्कन जिमखाना, तर कधी सणस मैदानावर सकाळी साडेसात वाजता पोचतो. सराव संपल्यावर अशाच पद्धतीने तो दुपारी घरी पोचतो. तरीही त्याच्यातील सहनशीलता टिकून आहे. याविषयी मनोज म्हणतो, ‘‘यासाठी मी ‘मेडिटिएशन आणि योगा’ करतो, त्याचा फायदा होतो. परिवारातील सदस्य, मित्र, डी. वाय. पाटील महाविद्यालयातील शिक्षक सर्वच जण मला सहकार्य करतात. त्यामुळे हे सर्व शक्‍य आहे. त्याची कहाणी ऐकून नागपुरातील मित्र परिवारातील प्रमोद पेंडके यांनी पुण्यातील संस्थेमार्फत मनोजला मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.