स्टार्टनेच केला बोल्टचा घात; 100 मीटरची अखेर ब्राँझने

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

उसेन बोल्टचे बोल...
​माझ्या स्टार्टनेच माझा घात केला. साधारणपणे फेऱ्यागणिक मी यात सुधारणा करतो, पण यावेळी हे जुळून आले नाही. मी हे करू शकलो नाही आणि म्हणूनच मी हरलो. प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा भन्नाटच होता. त्यांच्यामुळेच माझ्या कामगिरीला चालना मिळाली. मी त्यांच्यासाठी जिंकू शकलो नाही याचेच दुःख वाटते.

लंडन - वेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याला आपल्या 100 मीटर शर्यतीच्या कारकिर्दीची अखेर ब्राँझपदकाने करावी लागली. शर्यतीच्या स्टार्टनेच घात केल्याचे स्वतः बोल्टने मान्य केले आहे. अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनने सुवर्ण आणि ख्रिस्तीयन कोलोमनने रौप्यपदक पटकाविले.

जागतिक मैदानी स्पर्धेत 100 मीटर शर्यतीची शनिवारी मध्यरात्री अंतिम फेरी पार पडली. स्पर्धेचे आकर्षण असलेल्या शंभर मीटर शर्यतीत जमैकाचा उसेन बोल्ट, योहान ब्लेक, ज्युलियन फोर्टे, अमेरिकेचा जस्टिन गॅटलीन, ख्रिस्तीयन कोलमन, जपानचा अब्दुल हकीम ब्राऊन, माजी आशियाई विजेता चीनचा सु बिंगतान, बहरीनचा अँड्य्रू फिशर, फ्रान्सचा जिमी विकट या प्रमुख धावपटूंकडे लक्ष होते. मात्र, या सर्वांमध्ये जगाचे लक्ष लागले होते. ते उसेन बोल्टकडे. 100 मीटर कारकिर्दीची अखेर बोल्ट सुवर्णनेच करतो काय असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, त्याला अपयश आले आणि ब्राँझवर समाधाना मानावे लागले. 

बोल्टने लंडनमध्ये 2012 च्या ऑलिंपिक स्पर्धेत 100 मीटर शर्यत पार करून जागतिक विक्रम केला होता. आता याच ठिकाणी त्याला कारकिर्दीची अखेर ब्राँझने करावी लागली. गॅटलीनने 9.92 सेकंद आणि कोलोमनने 9.94 सेकंदात शर्यत पूर्ण करत सुवर्ण व रौप्य मिळविले. तर, बोल्टने ही शर्यत 9.95 सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेत बोल्ट 200 मीटर, 400 मीटर आणि रिले शर्यतीत धावणार आहे.

उसेन बोल्टचे बोल...
माझ्या स्टार्टनेच माझा घात केला. साधारणपणे फेऱ्यागणिक मी यात सुधारणा करतो, पण यावेळी हे जुळून आले नाही. मी हे करू शकलो नाही आणि म्हणूनच मी हरलो. प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा भन्नाटच होता. त्यांच्यामुळेच माझ्या कामगिरीला चालना मिळाली. मी त्यांच्यासाठी जिंकू शकलो नाही याचेच दुःख वाटते.