अण्णा हजारे शेतकरी-सरकार यांच्यात मध्यस्थीसाठी तयार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

'कुटुंब व पशुधन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत,' असे शेतकरी सांगत असताना सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्‍यक आहे.

राळेगणसिद्धी : "शेतकरी व सरकार यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारशी चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत माझी दोन वेळा चर्चा झाली; ते चर्चेस तयार आहेत,' असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे जाहीर केले.

हजारे यांनी म्हटले आहे की, सहनशीलता संपल्याने नाइलाज होऊन शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. "कुटुंब व पशुधन वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत,' असे शेतकरी सांगत असताना सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्‍यक आहे. सरकार शेतकऱ्यांच्या सहनशीलतेला दाद देत नसेल तर नाइलाजाने कायदा हातात घेण्याची वेळ येते. असे घडणे समाज व राष्ट्रहिताचे नाही. सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी.

"आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांची मला जाणीव आहे. मी या आंदोलनाशी सहमत आहे,' असे सांगून अण्णांनी पत्रकात म्हटले आहे, "शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी दोन वेळा फोनवर चर्चा झाली. ते चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची चर्चेसाठी तयारी असेल तर मी बैठकीसाठी उपस्थित राहीन.'