बेळगावमध्ये आज ‘बस डे’

बेळगावमध्ये आज ‘बस डे’

बेळगाव - दुचाकी किंवा चारचाकी घेतल्यानंतर बसमधून प्रवासाची केवळ आठवणच बनून राहते. ती आठवण पुन्हा ताजी करण्यासाठी आणि वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महिन्यातील एक दिवस ‘बस डे’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय वायव्य मार्ग परिवहनने घेतला आहे. त्यानुसार दर महिन्याच्या २० तारखेला बस डे होणार असून सोमवारी तो साजरा केला जाणार आहे.

बसमधून प्रवास करताना पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देता येणार आहे. वायव्य परिवहन मंडळाने सोमवारी ‘बस डे’चे आयोजन केले असून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने घरीच ठेवून प्रदूषण कमी करण्यासाठी बसमधून प्रवास करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ परिवहन मंत्री एच. एम. रेवण्णा यांच्या हस्ते होणार आहे.

शहर बसस्थानकावर (सीबीटी) आज (ता. २०) सकाळी अकरा वाजता परिवहन मंडळाच्या महत्त्वाकांक्षी बस डे उपक्रमाची सुरुवात होणार आहे. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, पायाभूत सुविधा मंत्री रोशन बेग, अवजड उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे, वायव्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष सदानंद डंगण्णावर यांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे.

परिवहन मंडळाचे अध्यक्ष मागील पंधरा दिवसांपासून बेळगाव शहरात या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून मंत्री स्वतः उद्या परिवहनच्या बसेसचा वापर करणार आहेत. शनिवारी श्री. डंगण्णावर यांनी शहराच्या विविध ठिकाणी याबाबत जागृतीही केली. हुबळी येथे जुलैमध्ये परिवहन मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाला प्रतिसाद लाभला आहे. हुबळी येथेही दर महिन्याच्या २० तारखेला उपक्रम राबविला जात असून यादिवशी १० हजारहून अधिक प्रवाशांची नवे प्रवासी म्हणून नोंद होत आहे. बेळगाव शहरातही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभेल, असे परिवहन मंडळाच्या अध्यक्षांचे मत आहे.

नोकरदार, विद्यार्थ्यांकडून दुचाकी खरेदी करून त्याचाच अधिक वापर केला जात असल्याने शहरात वाहतुकीची कोंडी वाढत आहे. त्यातच वाहनांची संख्या वाढीस लागल्याने वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणही वाढत आहे. शहराची वाहतूक कोंडी कमी करून महिन्यातून एक दिवस सर्वांनी परिवहनच्या बसेसचा वापर केल्यास बेळगावचे प्रदूषणही कमी करण्यास वाव मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com