शरद पवार घेणार डिसेंबरअखेरपर्यंत समितीचा मेळावा

शरद पवार घेणार डिसेंबरअखेरपर्यंत समितीचा मेळावा

बेळगाव - कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यात एल्गार उठविला. एकप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणांगणच पेटविण्यात आले. आता समितीच्या विजयासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेसुध्दा कंबर कसणार असून डिसेंबरअखेरपर्यंत बेळगाव समिती कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.

शरद पवार यांनी १९८६ च्या कन्नडसक्‍तीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. कर्नाटकची बंदी झुगारून त्यांनी वेशांतर करून बेळगावात प्रवेश केला होता. त्यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध नेत्यांनीही बेळगावात आंदोलन केले होते. शरद पवार यांना अटक झाली होती. त्यामुळे सीमाप्रश्‍नाची तड लागली नाही, ही खंत त्यांच्या मनात कायम असून याचा उल्लेख त्यांनी आत्मचरित्रातही केला आहे. आता पुन्हा ते सीमालढ्यासाठी सक्रिय झाले असून महामेळाव्यात त्यांच्याच आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील यांनी बेळगावात उपस्थिती दर्शविली होती. 

सीमाप्रश्‍न निर्णायक वळणार असल्यामुळे आता कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती काम करत आहे. आगामी विधानसभा निवडणुका यासुद्धा लढ्याचाच एक महत्त्वाचा भाग असल्याने लोकेच्छा हा सीमालढ्याच्या दाव्यातील मुख्य घटक सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या निवडणुका जिंकाव्याच लागणार आहेत. त्यामुळे यासाठी रणनिती आखावी लागणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी महामेळावा यशस्वी करूच; पण मी स्वत: डिसेंबरअखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेळगावात येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे सांगितले आहे. 

शरद पवार पुन्हा लढ्यात सक्रिय होत असल्याने समिती कार्यकर्त्यांत नवा जोश निर्माण होत आहे. पाच वर्षांत स्थित्यंतरे होत आली आहेत. राष्ट्रीय पक्ष मराठी कार्यकर्त्यांना आपल्या गळाला ओढत असून त्यांना काही प्रमाणात यशही आले आहे. सीमाभागातील म. ए. समितीचे वर्चस्व कायम राखण्यासाठी आता शरद पवार कंबर कसणार आहेत. डिसेंबरच्या २४ तारखेपर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन चालेल. त्यानंतर बेळगावात मेळावा घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.

प्रशासनाने महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घातली. महामेळाव्याला परवानगीही दिली नव्हती. तरीही मराठी जनतेने कसलीही तमा न करता बळावर महामेळावा यशस्वी केला. महामेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. आपली मते फुटू नयेत, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून आगामी काळात शरद पवार बेळगावातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे सुतोवाच केले. त्यामुळे आता महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांची जबाबदारी वाढली असून शरद पवार यांच्या मेळाव्यानंतर निर्माण होणाऱ्या संधीचे सोने करण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे.

पुन्हा भेट घेणार : म. ए. समिती
काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बारामती येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बेळगावात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या मेळाव्याबाबत पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेऊन तारीख निश्‍चित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com